अमरावतीमधील चांदूरबाजारचे चार वाहतूक पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 18:40 IST2016-07-21T18:40:20+5:302016-07-21T18:40:20+5:30
गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने घडविलेल्या अपघातमालिकेनंत चांदूरबाजार येथील सर्व चार वाहतूक पोलीस निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ही कारवाई केली.

अमरावतीमधील चांदूरबाजारचे चार वाहतूक पोलीस निलंबित
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 20 - गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने घडविलेल्या अपघातमालिकेनंत चांदूरबाजार येथील सर्व चार वाहतूक पोलीस निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ही कारवाई केली.
वाहतूक पोलिसांना निलंबित करणाऱ्या लखमी गौतम यांनाही निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी चांदूरबाजार येथील नागरिक कमालिचे संतप्त झाले होते. लखमी गौतम यांच्याविरुद्ध आरोग्य केंद्रात आणि इतर ठिकाणी जोरदार नारेबाजी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकाविरुद्ध इतक्या प्रचंड प्रमाणात रोष उफाळून येण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रसंग आहे.
लखमी गौतम यांच्याविरुद्ध रोष असल्याने चांदूरबाजार येथील जमावाला संबोधित करण्याचे धाडस ते दाखवू शकले नाहीत. जिल्हाधिकारी किरण गित्ते हे घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाच्यावतीने ते स्थिती हाताळत आहेत.
अचलपूरचे आमदार बच्चू कडू घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत इंगळे हे कडू यांच्या प्रहार पक्षाचे कार्यकर्ता होते. मृतांच्या शवांचे अद्यापही विच्डेदन झालेले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक गौतम यांच्यावर कठोर कारवाई करा त्यानंतरच शवविच्छेदन करू देऊ अशी ताठर भूमिका नागरिक आणि नातेवाईकांनी घेतली आहे. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या निषेधार्थ अवघे चांदूरबाजार आज उत्स्फुर्त बंद ठेवण्यात आले आहे. शाळादेखील बंद ठेवण्यात आल्यात. गुरुवारी इयत्ता दहावीची परीक्षा असल्यामुळे नगरपालिका विद्यालयात परीक्षेची व्यवस्था करण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण असून नियंत्रण ठेवण्यासाठी वाशिम जिल्ह्यातूनही पोलीस कुमक बोलविण्यात आली. ट्रकचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी नागरिकांनी लावून धरली. जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून जनतेच्या भावना पोहचविल्या.