यवतमाळमध्ये अपघातात चार विद्यार्थी ठार
By Admin | Updated: February 19, 2016 03:40 IST2016-02-19T03:40:33+5:302016-02-19T03:40:33+5:30
विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणाऱ्या पिक-अप वाहनाला ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चार शालेय विद्यार्थी ठार तर सहा जखमी झाले. मृतांमध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

यवतमाळमध्ये अपघातात चार विद्यार्थी ठार
वणी (यवतमाळ) : विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणाऱ्या पिक-अप वाहनाला ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चार शालेय विद्यार्थी ठार तर सहा जखमी झाले. मृतांमध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
गुरुवारी सकाळी ७.४५ वाजता येथील वणी-वरोरा बायपासवर हा अपघात घडला. गौरव हिरामण देऊळकर (१५), श्रद्धा प्रदीप हुलके (१४), श्रेया रवींद्र उलमाले (१२) आणि दिशा राजू काकडे (१२) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. ते येथील मॅक्रून स्टुडन्ट अॅकेडमीचे विद्यार्थी आहेत. सहा जखमी विद्यार्थ्यांवर वणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिक अपचा चालक गणेश गुलाब बोढाले (२३) हा गंभीर जखमी असून, त्याला नागपूरला हलविले आहे.
वणीहून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावरील वणी-वरोरा बायपासवरून १० विद्यार्थ्यांना घेऊन पिक-अप वाहन चालले होते. समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने विद्यार्थ्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यात श्रद्धा व गौरव जागीच ठार झाले. श्रेया व दिशा यांचा नागपूरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालक नियाज सिद्दीकी (३२) यास अटक केली. (प्रतिनिधी)