गोळीबाराच्या तपासासाठी चार पथके
By Admin | Updated: April 13, 2015 05:29 IST2015-04-13T05:29:18+5:302015-04-13T05:29:18+5:30
कामावरून घरी परतत असताना दोन हल्लेखोरांनी प्रमोद कामटेकर (४०) या तरुणावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी शिवडी परिसरात घडली

गोळीबाराच्या तपासासाठी चार पथके
मुंबई : कामावरून घरी परतत असताना दोन हल्लेखोरांनी प्रमोद कामटेकर (४०) या तरुणावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी शिवडी परिसरात घडली. यामध्ये या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून आर.ए.के. मार्ग पोलिसांनी या हल्लेखोरांच्या शोधासाठी चार पथके तयार केली आहेत.
शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना महाजनी पथ परिसरात घडली. याच परिसरात स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय करणारा कामटेकर हा त्याच्या अॅक्टिव्हावरून घराच्या दिशेने जात होता. याच वेळी दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले. त्यांनी कामटेकर याला रस्त्यामध्येच रोखून त्याच्यावर फायरिंग सुरू केली. यामध्ये दोन गोळ्या छातीमध्ये तर दोन गोळ्या पोटामध्ये लागल्या. त्यानंतर मारेकरी फरार झाले. येथील रहिवाशांनी या फायरिंगबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जखमी कामटेकरला केईएम रुग्णालयात दाखल केले. रात्रीच कामटेकरवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत आर.ए.के. मार्ग पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.