कोकणातील चार नद्यांचे होणार पुनरुज्जीवन
By Admin | Updated: January 7, 2016 02:19 IST2016-01-07T02:19:46+5:302016-01-07T02:19:46+5:30
कोकणातील पाण्याचे नियोजन करून चार प्रमुख नद्यांना पुनर्जिवन देण्यासाठी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी पुढाकार घेतला आहे.

कोकणातील चार नद्यांचे होणार पुनरुज्जीवन
मुंबई : कोकणातील पाण्याचे नियोजन करून चार प्रमुख नद्यांना पुनर्जिवन देण्यासाठी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सिंह एक लोकचळवळ उभारणार असून त्याची सुरूवात १५ ते १९ जानेवारीदरम्यान कोकण जलपरिक्रमेने होणार आहे. या अभियानाची घोषणा बुधवारी झाली.
कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान व जलबिरादरी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या जलअभियानाची सुरूवात होत आहे. त्यानुसार कोकणातील गांधारी, जगबुडी, अर्जुना नदी, जानवली नदी या चार नद्यांवर काम करण्यात येईल. नद्यांवर बांध घालणे, गाळाने भरलेले डोह उपसून पूर्ववत करणे, साठलेल्या पाण्याचा उपयोग आधुनिक शेती व रोजगार निर्मितीसाठी करणे या सर्व गोष्टी अभियानाच्या माध्यमातून राबवल्या जातील. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, कोकणात पाण्याची कमतरता नसली, तरी नियोजनाअभावी पुढील चार वर्षांत फार बिकट परिस्थिती निर्माण होईल. सध्यातरी येथील चाकरमानी मुंबई, पुणे सारख्या शहरांतील उत्पन्नावर जगत आहेत. मात्र ही लक्ष्मीही त्यांना यापुढे तारू शकणार नाही. त्यामुळे भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हे सोपे काम आटोपण्याचा प्रयत्न असेल. नंतर मराठवाडा आणि विदर्भ येथील नियोजनावर काम करणार आहे.
पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या नाहीच : पाण्याअभावी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतात, हे साफ चुकीचे कारण असल्याचे मत सिंह यांनी मांडले. ते म्हणाले, देशात पाण्याची सर्वाधिक कमतरता राजस्थानमध्ये आहे. मात्र, तिथे एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. बँक आणि शेतीच्या बाजारीकरणातील दुष्टचक्रामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत.
मराठवाड्यात ऊस उत्पादनावर बंदी घाला : पाणी आणि मातीची कमतरता आहे, अशा ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने असणे, चुकीचे असल्याचे मत सिंह यांनी व्यक्त केले. दुष्काळग्रस्त भागातील उसाच्या उत्पादनावर बंदी घालून, त्या ठिकाणी कमी पाण्यावर येणारी पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.