प्रकल्पग्रस्तांना चार महिन्यात नागरी सुविधा
By Admin | Updated: December 23, 2015 23:30 IST2015-12-23T23:30:44+5:302015-12-23T23:30:44+5:30
वीर बाजी पासलकर प्रकल्प व पानशेत प्रकल्पांतर्गत खडकवासला, पानशेत वरसगाव या प्रकल्प बाधित धरणग्रस्तांचे पुनर्वसन हवेली व दौंड तालुक्यात करण्यात आले आहे.

प्रकल्पग्रस्तांना चार महिन्यात नागरी सुविधा
नागपूर : वीर बाजी पासलकर प्रकल्प व पानशेत प्रकल्पांतर्गत खडकवासला, पानशेत वरसगाव या प्रकल्प बाधित धरणग्रस्तांचे पुनर्वसन हवेली व दौंड तालुक्यात करण्यात आले आहे. यातील २७ ठिकाणी नागरी सुविधा देणे शिल्लक आहेत. यासाठी १३९ कोटीची तरतूद करण्यात आली असून येत्या चार महिन्यात या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिले.
राहुल कुल यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे बोलत होते. खडसे यांनी सांगितले की, वीर बाजी पासलकर प्रकल्पातील २०९४ प्रकल्पग्रस्तांपैकी २०५६ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप केले असून ३८ प्रकल्पग्रस्त शिल्लक आहेत. पानशेत प्रकल्पातील १३०२ प्रकल्पग्रस्तापैकी १२९८ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप केली असून केवळ ४ प्रकल्पग्रस्त शिल्लक असून उर्वरित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शासन कटिबद्ध आहे. दोन्ही प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना १२७२.२८ हेक्टर वनजमीन वाटप करण्यात आली आहे. या जमिनीपैकी काही क्षेत्राचे निर्वनीकरण झालेले असून ज्या क्षेत्राचे निर्वनीकरण अद्याप झाले नाही, त्या क्षेत्राची माहिती संकलित करून निर्वनीकरणाचा एकत्रित प्रस्ताव वन विभागाकडे पाठविण्यात येईल, असेही खडसे यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला. (प्रतिनिधी)