चॉपरच्या धाकावर लूट करणारी चौघा जणांची टोळी जेरबंद
By Admin | Updated: July 10, 2017 20:50 IST2017-07-10T20:50:39+5:302017-07-10T20:50:39+5:30
चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या वागळे इस्टेट, साठेनगर भागातील राजू साठे (२०), रोशन यादव (२९), सुरज हजारे (२२) आणि एक अल्पवयीन अशा चौघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

चॉपरच्या धाकावर लूट करणारी चौघा जणांची टोळी जेरबंद
ऑनलाइन लोकमत
ठाणे : चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या वागळे इस्टेट, साठेनगर भागातील राजू साठे (२०), रोशन यादव (२९), सुरज हजारे (२२) आणि एक अल्पवयीन अशा चौघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाइल, चार हजारांची रोकड, एक एटीएमकार्ड आणि चॉपर असा ऐवज जप्त केला आहे.
भांडुप येथील रहिवासी रणजित सुर्वे हे २९ जून २०१७ रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास गोपालाश्रम हॉटेल येथे जेवणासाठी गेले होते. तिथून त्यांना रिक्षाने भांडुपला जायचे होते. तेव्हा दीपक मालेकर (१७, नावात बदल) या रिक्षाचालकाने त्यांना सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवले. त्यांच्या बाजूलाच दीपकचा साथीदार सुरज हाही बसला. त्यांच्यापाठोपाठ राजू आणि यादव हे त्यांचे इतर दोन साथीदारही मोटारसायकलवरून रिक्षापाठोपाठ आले. रिक्षा काही अंतरावर गेल्यानंतर सुरजने त्यांना चॉपरचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन मोबाइल आणि १० हजारांची रोकड असलेले पाकीट जबरीने लुटले. पाकिटात एटीएमकार्ड आणि काही कागदपत्रेही होती. त्यांच्याकडील एटीएमवर पासवर्ड लिहिलेला मिळाल्यामुळे त्याद्वारे त्यांनी २९ जून रोजी २८ हजारांची रोकड वागळे इस्टेट येथील एका एटीएम केंद्रावरून काढली. दरम्यान, याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात सुर्वे यांनी तक्रारही दाखल केली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, हवालदार आर.आर. गार्डे, एस.आर. आसळकर, व्ही.जे. सावंत आदींच्या पथकाने चौघांनाही वागळे इस्टेट भागातून ८ जुलै रोजी अटक केली. त्यांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून चार हजारांची रोकड, दोन मोबाइल, एक एटीएम आणि सुरेश हजारे याच्याकडून चॉपर हस्तगत केला आहे. जबरी चोरीमध्ये लुटलेला मोबाइल दीपकने त्याचा साथीदार रोशन याला तीन हजारांमध्ये विकला होता.
पैसे काढायला गेले आणि अडकले-
लुटमार केल्यानंतर पुन्हा २९ जून रोजी हे टोळके एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेले. दीपक आणि राजू साठे हे रोकड काढतानाचे सीसीटीव्हीचे फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची साठेनगर भागात धरपकड केली. लुटमारीतील पैसे येऊर भागात पार्टीवर खर्च केल्याचीही त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.