कोपरखैरणेतील चार मजली इमारत जमीनदोस्त
By Admin | Updated: March 2, 2017 02:43 IST2017-03-02T02:43:19+5:302017-03-02T02:43:19+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको व महापालिकेने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली

कोपरखैरणेतील चार मजली इमारत जमीनदोस्त
नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको व महापालिकेने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत बुधवारी कोपरखैरणे, सेक्टर १२ येथील एक चार मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. तसेच याच परिसरातील सेक्टर ९मध्ये सिडकोच्या जागेवर उभारलेल्या काही बेकायदा झोपड्यांवरही या वेळी कारवाई करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा सिडकोचे मुख्य अनधिकृत बांधकाम नियंत्रक शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
कोपरखैरणे सेक्टर १२मध्ये इ. बा. पटेल यांनी संबंधित विभागाची कोणतीही परवानगी न घेता तळमजला अधिक चार मजल्याची इमारत उभारली आहे. सध्या या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले होते. त्यामुळे सिडको आणि महापालिकेने या बांधकामाला नोटीस बजावली होती; परंतु संबंधित बांधकामधारकाने त्यास कोणताही प्रतिसाद न दिल्याने बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यावर कारवाई करण्यात आली. तसेच याच परिसरातील सेक्टर ९मध्ये बालाजी थिएटरच्या समोरील मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात बेकायदा झोपड्या उभारल्या आहेत. त्यावरही या वेळी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, या झोपड्यांवर यापूर्वीही अनेकदा कारवाई केली होती. या कारवाईप्रसंगी सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक पी. बी. राजपूत, सहायक बांधकाम नियंत्रक गणेश झिने, तसेच महापालिकेचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे, कोपरखैरणे विभाग अधिकारी अशोक मढवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)