गुजरातचे चार साईभक्त अपघातात ठार
By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:20+5:302015-06-14T01:54:20+5:30
गुजरातमधील वापी शहरात राहणारे चौघे मित्र शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनासाठी निघाले असताना शुक्रवारी मध्यरात्री पेठरोडवरील एका चिंचेच्या झाडावर त्यांची मोटार जाऊन आदळली.

गुजरातचे चार साईभक्त अपघातात ठार
नाशिक : गुजरातमधील वापी शहरात राहणारे चौघे मित्र शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनासाठी निघाले असताना शुक्रवारी मध्यरात्री पेठरोडवरील एका चिंचेच्या झाडावर त्यांची मोटार जाऊन आदळली. त्यात मोटारीचा चक्काचूर होऊन चौघे तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
गुजरात येथून चौघे मित्र शिर्डी दर्शनासाठी कारने नाशिकमार्गे जात होते. शहरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पेठरोडवर त्यांच्यावर काळाने घाला घातला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटार थेट रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन आदळली. त्यात पंकज भिकनभाई मोरे (२९), अतिक समद शेख (३०), जयकिशोर प्रभाकर (२७), विरल रमेश पटेल (२७, सर्व रा. वापी) यांचा मृत्यू झाला. इलेक्ट्रिक कटरने मोटारीचा दरवाजा कापून चौघांना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या पटेल यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले. (प्रतिनिधी)