नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात मुंबईकडे जाणाऱ्या कारवर वीज प्रकल्पाच्या राखेची वाहतूक करणारा कंटेनर आदळल्याने मुंबई-अंधेरीतील चारजण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात कार पूर्ण चेपली गेली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरुडेश्वर येथील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रम येथे दर्शन आटोपून घरी परतताना ही दुर्घटना घडली. कंटेनरचालकाने मद्य प्राशन केल्याचे सांगण्यात येते. त्याला अटक करण्यात आले.
अंधेरी येथून गुरुवारी सकाळी गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी मुंबई येथील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमात मुंबई येथून शेकडो गुरुबंधू आले होते. त्यातील एकाच कुटुंबातील तीन भाविक आणि चालक असे चारजण कारमधून अंधेरी येथे जाण्यासाठी निघाले. त्यांची कार महामार्गावर येताच काही मिनिटांत कारला टँकरने धडक दिली. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी नित्यानंद सावंत (६२), विद्या सावंत (६५), वीणा सावंत (६८) तसेच चालक दत्तात्रेय अंब्राले (रा. मुंबई) जागीच ठार झाले. तिघेही मृत अविवाहित आहेत. नित्यानंद सावंत हे मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी होते. विद्या सावंत महानगर टेलिफोन निगमच्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.
ओव्हरटेकने घात केलागरुडेश्वर येथील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रम येथे दर्शन आटोपून सावंत कुटुंबीय दुपारी १ वाजेच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी निघाले. महामार्गावर राख भरलेल्या टँकरने ओव्हरटेक करण्याच्या नादात कारला कट मारल्याने बल्गर टँकर कारवर आदळला. यावेळी कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कार दगडी बॅरिकेड्समध्ये अडकली होती.