उद्धव यांच्या छायाचित्रांतून चार कोटींचा निधी
By Admin | Updated: January 13, 2015 03:12 IST2015-01-13T03:12:31+5:302015-01-13T03:12:31+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या आर्थिक मदतीकरिता आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनातून सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उभा

उद्धव यांच्या छायाचित्रांतून चार कोटींचा निधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या आर्थिक मदतीकरिता आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनातून सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उभा राहिला असल्याचे शिवसेनेतून सांगण्यात आले. ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवण्यात येईल त्याची घोषणा खुद्द ठाकरे करणार आहेत.
येथील जहांगिर कला दालनात उद्घव यांनी ७० छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. प्रत्येक चित्राच्या तीन प्रती यानुसार २१० छायाचित्रे विक्रीला ठेवली होती. यामधील बहुतांश छायाचित्रे विकली गेली असून त्यातून रविवारी सायंकाळपर्यंत तीन कोटी रुपये जमा झाले होते. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी अनेक मान्यवरांनी भेट देऊन छायाचित्रांची खरेदी केल्याने ही रक्कम चार कोटी रुपयांच्या घरात पोहोचेल, असा अंदाज आहे.
उद्धव यांच्या प्रदर्शनाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेते अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी, रतन टाटा, राहुल बजाज आदींनी भेट दिली. उद्धव यांनी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. शेतक-यांच्या मदतीला येऊ शकलो याचा आपल्याला आनंद असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)