चार बालकामगारांची सुटका
By Admin | Updated: April 30, 2016 02:26 IST2016-04-30T02:26:57+5:302016-04-30T02:26:57+5:30
तुर्भे एपीएमसी येथील शीतगृहात काम करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे.

चार बालकामगारांची सुटका
नवी मुंबई : तुर्भे एपीएमसी येथील शीतगृहात काम करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व गुन्हे शाखेने ठाणे येथील कामगार उपायुक्तांच्या सहाय्याने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधित शीतगृहांच्या मालकांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसीच्या मॅफ्को मार्केटमधील प्रभू हिरा कोल्ड स्टोअरेज आणि युनिक पटेल कोल्ड स्टोअरेज या दोन शीतगृहांत बालकामगार काम करीत असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखेचे दिलीप सावंत व सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी ठाणे येथील कामगार उपायुक्त कार्यालयाच्या सहकार्याने या शीतगृहांची तपासणी केली. त्याप्रसंगी या शीतगृहांत १३ ते १४ वयोगटातील चार मुले भर उन्हात साफसफाई, भाजीचे पॅकिंग तसेच लोडिंग, अनलोडिंगचे काम करताना दिसून आले. या चारपैकी तीन मुले बिहार येथील किसनगंज जिल्ह्यातील तर उर्वरित एक मुलगा झारखंडच्या साहेबगंज येथील आहे. कामगार अधिकाऱ्यांनी या मुलांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता शीतगृहांच्या मालकांकडून त्यांना अमानुष वागणूक दिली जात आहे.
तसेच त्यांना वेतन न देता अतिरिक्त काम करून घेतले जात असल्याची बाब समोर आले. त्यानुसार दोन्ही शीतगृहांच्या मालकांच्या विरोधात बालकामगार अधिनियम १९८६ अन्वये एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या मुलांना सध्या सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. लवकरच बालकल्याण समितीमार्फत या
मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या
सुपूर्द करण्यात येणार असल्याचे एपीएमसी पोलिसांनी स्पष्ट केले
आहे. (प्रतिनिधी)