सावरकर स्मारक जाळपोळ प्रकरणी चौघांना अटक
By Admin | Updated: June 14, 2014 04:48 IST2014-06-14T04:48:39+5:302014-06-14T04:48:39+5:30
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतील स्मारकात जाळपोळ केल्याप्रकरणी चार संशयितांना अटक

सावरकर स्मारक जाळपोळ प्रकरणी चौघांना अटक
सांगली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतील स्मारकात जाळपोळ केल्याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना आज (शुक्रवार) दुपारी यश आले. उगारखुर्द (ता. अथणी) येथे चौघांना पकडण्यात आले. येथील गावभागातील अमरधाम स्मशानभूमीजवळ चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. संशयितांनी खोडसाळपणाने स्मारकात जाळपोळ केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्यांमध्ये नितेश दिलीप व्हराळे ( २२), अमनदीप राजेंद्र कांबळे (२५), किरण पंडित बेळकुंडे (२२, हरिपूर रस्ता) व प्रीतम दिनकर जयकर (२२) यांचा समावेश आहे. त्यांना उद्या (शनिवार) दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
चार दिवसांपूर्वी (सोमवार) अमरधाम स्मशानभूमीजवळील कट्ट्यावर रात्री जेवण केल्यानंतर चौघेजण गप्पा मारत बसले होते. त्यांच्यात फेसबुकवर राष्ट्रपुरुषांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचा विषय निघाला. त्यावेळी जयकरने आपणही या घटनेचा निषेध करण्यासाठी एसटी बस फोडल्या पाहिजेत, यासाठी कोल्हापूर रस्त्यावर जाऊया, असे सुचविले. त्यावेळी अन्य तिघांनी, एवढ्या लांब कशाला, जवळच असलेल्या बाबाराव स्मारकात जाळपोळ करू, असे सांगितले. चौघांचे एकमत झाल्यानंतर साडेअकराला ते स्मारकाबाहेर जाऊन बसले. साडेबाराला दरवाजाचे कुलूप तोडून आत गेले. सुरुवातीला स्मारकाच्या सभागृहातील सोफासेट पेटविला. त्यानंतर पुस्तकांची खोली पेटवून दिली.
या जाळपोळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह दुर्मिळ ग्रंथ-पुस्तके, सावरकरांचे वैचारिक वाङ्मय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रचार पुस्तके अशी दीड हजारावर गं्रथसंपदा जळून खाक होऊन दोन लाखांचे नुकसान झाले होते. या घटनेचा बाबाराव सावरकर स्मारक विश्वस्त संस्थेचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना व संघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध करून संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीसप्रमुख सावंत यांच्याकडे केली होती. या प्रकरणी राज्यभरात सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)