महामंडळ वाटपात ७०-३० चा फॉर्म्युला
By Admin | Updated: June 7, 2015 02:43 IST2015-06-07T02:43:30+5:302015-06-07T02:43:30+5:30
राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्या आठवडाभरात केल्या जाणार असून, त्यात भाजप ७० टक्केआणि शिवसेना ३० टक्के याप्रमाणे फॉर्म्युला राहील

महामंडळ वाटपात ७०-३० चा फॉर्म्युला
औरंगाबाद : राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्या आठवडाभरात केल्या जाणार असून, त्यात भाजप ७० टक्केआणि शिवसेना ३० टक्के याप्रमाणे फॉर्म्युला राहील, असे भाजप नेते तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज औरंगाबादेत सांगितले.
बुलडाणा जिल्ह्णातील कार्यक्रम आटोपून मुंबईला विमानाने जाण्यासाठी विनोद तावडे औरंगाबादेत आले होते. या दरम्यान, औरंगाबादेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महामंडळांच्या नियुक्त्या राहिलेल्या आहेत. त्या आठवडाभरात होणार आहेत. त्याआधी शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. या बैठकीत कोणते महामंडळ कोणाकडे राहील हे निश्चित केले जाईल; पण एकूण महामंडळ वाटपात भाजप आणि शिवसेनेमध्ये ७०-३० चा फॉर्म्युला राबविला जाईल. राज्यात भाजपचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे भाजपकडे ७० टक्के महामंडळे असतील, तर शिवसेनेच्या वाट्याला ३० टक्के महामंडळे जातील, असेही ते म्हणाले. महामंडळाच्या नियुक्त्यात पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्याही नियुक्त्या या आठवड्यात होणार आहेत. उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस या पदांवर नव्याने नियुक्त्या होतील.