लातूरमध्ये माजी मंत्र्यांच्या मुलाची आत्महत्या
By Admin | Updated: December 30, 2014 01:21 IST2014-12-30T01:21:09+5:302014-12-30T01:21:09+5:30
माजी मंत्री भाई किसनराव देशमुख यांचे चिरंजीव डॉ. अभय देशमुख (४७) यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून सोमवारी आत्महत्या केली.

लातूरमध्ये माजी मंत्र्यांच्या मुलाची आत्महत्या
अहमदपूर (जि. लातूर) : माजी मंत्री भाई किसनराव देशमुख यांचे चिरंजीव डॉ. अभय देशमुख (४७) यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून सोमवारी आत्महत्या केली. आजाराला कंटाळून डॉ़ अभय यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले़ संध्याकाळी हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगा, भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.
माजी राज्यमंत्री भाई किसनराव देशमुख यांच्या अहमदपूर येथील निवासस्थानी डॉ. अभय यांनी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून आपल्या कानसुलात गोळी झाडली. मोठा आवाज झाल्याने नोकर त्यांच्या खोलीत गेला तर डॉ. अभय रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसले़ त्याने शेजाऱ्यांना बोलावून
त्यांना जवळच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तोपर्यंत त्यांचा अती रक्तस्राव झाला होता. तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या चमूने त्यांना मृत घोषित केले. गोळी त्यांच्या कानशिलातून आत घुसली व डोक्यात अडकली होती. शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. अनेक दिवसांपासून ते पोटाच्या आजाराने त्रासले होते. (प्रतिनिधी)