Shiv Sena Shinde Group And Thackeray Group: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक मोठे खिंडार पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ठाकरे गटातील ५० माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत, असे समजते. ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा सिलसिला सुरूच आहे. मुंबईतील काही भागांमधील माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदेसेनेत सामील झाल्यानंतर आता जळगाव, परभणी येथील माजी नगरसेवक, पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती एक्सवर एक पोस्ट करून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रुपेश माळी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, उप-तालुकाप्रमुख युवासेना अनिल महाजन, शहरप्रमुख अजय महाजन तसेच त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, एरंडोलचे आमदार अमोल चिमण आबा पाटील, माजी खासदार ऍड.सुरेश जाधव, परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे, शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यातील पदाधिकारीही शिंदेसेनेत आले
परभणी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे, उपजिल्हाप्रमुख सुनीता घाडगे, गंगाखेड तालुक्यातील शारदा वावळे, पुणे जिल्हा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नीता भोसले, लक्ष्मी माने यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जोरदार तयारी सुरू केली असली, तरी दुसरीकडे माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करत असल्याने ठाकरे गटाला निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरू शकते, असे म्हटले जात आहे.