भाजप नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर
By Admin | Updated: February 7, 2015 00:12 IST2015-02-06T23:24:01+5:302015-02-07T00:12:46+5:30
सुप्रिया सुळे : केंद्र, महाराष्ट्रातील शंभर दिवसांचा कार्यक्रमही ‘फेल’

भाजप नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर
सांगली : भाजपच्या नेत्यांनी, शंभर दिवसात विकासाचा डोंगर उभा करतो, अशी खोटी आश्वासने देऊन केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळविली. निवडणुकीच्या कालावधित शंभर दिवसात महागाई कमी करण्यासह परदेशातील काळा पैसा परत आणण्याच्या, टोल हटविण्याच्या घोषणा केल्या होत्या. पण, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगलीत आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत केली.त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे त्यांनी जनाधाराचा आदर करून दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत. परंतु, सध्या या दोन्ही सरकारचा कारभार पाहिल्यास, त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. महाराष्ट्र सरकारला काम करण्यासाठी जरूर अजून अवधी दिला पाहिजे. त्यांना चांगल्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच मदत करेल. मात्र, शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय होणार असतील, तर रस्त्यावरही उतरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांनी, सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादीचे आमदार भाजप सरकारला जाब विचारतील, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या योजनांचा केंद्राकडून वापर
महाराष्ट्रात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या संपूर्ण स्वच्छता अभियान, इकोव्हिलेज आदी योजना केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार राबवत आहे, हा महाराष्ट्राचा गौरव आहे. महाराष्ट्राकडून या योजना घेताना जशाच्या तशा राबविण्याची गरज होती. परंतु, केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविताना गावांची निवड केली असून त्यासाठी कुठलाही निधी मिळाला नाही. यामुळे कोणतीही ठोस अशी कामे करता येत नाहीत. याबद्दल मोदी यांना पत्रव्यवहार करून कळविले असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.