वनअधिकारी, पोलिसांवर दगडफेक

By Admin | Updated: December 26, 2014 00:45 IST2014-12-26T00:37:32+5:302014-12-26T00:45:04+5:30

जांबोटी ग्रामस्थ संतप्त : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याचे पडसाद

Forest officials, police picketing | वनअधिकारी, पोलिसांवर दगडफेक

वनअधिकारी, पोलिसांवर दगडफेक

बेळगाव : बेळगाव-जांबोटी-भीमगड अभयारण्यात सोडलेल्या नरभक्षक वाघाने जांबोटी-माजिवडे गावातील अंजना हणबर (वय २३) या महिलेला ठार केल्यानंतर त्या महिलेचे शव शोधण्याची मोहीम सुरू झाली. यादरम्यान वाघाला नियंत्रित करण्यात अपयश आल्याचा आरोप करून संतप्त लोकांनी पोलीस व वन अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले आहेत.
कर्नाटकातील चिक्कमंगळूरमधून बेळगावजवळील जंगलात सोडलेल्या नरभक्षक वाघाला स्थलांतरित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे
गेल्या १८ आॅक्टोबरला चिक्कमंगळूरमधून नरभक्षक वाघ बेळगावातील जांबोटी-भीमगड अभयारण्यात सोडला होता. या वाघाने जनावरे, गायींवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. मात्र काल, बुधवारी जांबोटीजवळील माजिवडे गावाजवळ शेतात मळणी करायला गेलेल्या २२ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून जंगलात पळवून नेऊन ठार केले होते.
या महिलेचे शव शोधण्यासाठी वन व पोलीस अधिकाऱ्यांनी काल, बुधवारी रात्रीपासूनच मोहीम हाती घेतली होती. आज, गुरुवारी सकाळी महिलेचे शव माजिवडे जंगलात २ कि.मी. आत नेऊन ठेवले होते. मृत महिलेच्या अंगाचे वाघाने लचके तोडले होते.
ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यावर वाघाला नियंत्रित न करता आल्याने सदर महिलेचा जीव गेल्याचा आरोप करीत आमदार आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेल्या ११ डिसेंबरला वाघाला पकडण्याचे आदेश असतानाही वाघ पकडण्यात अपयश आले आहे. बेळगाव शहराजवळ ११ कि.मी. अंतरावर असणाऱ्या व्ही.टी.यु. विद्यापीठातदेखील वाघ दिसला होता.
दरम्यान, अंबाडी माधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, वाघाला पकडून म्हैसूर संग्रहालयात सोडण्याचे आदेश ११ डिसेंबरला मिळाले असून, वाघाला पकडण्यासाठी टीम बनविल्या आहेत. वाघाला गोळी घाला, अन्यथा जिवंत पकडून म्हैसूर प्राणी संग्रहालयात सोडा, असे आदेश मिळाले आहेत. मृताच्या वारासदारांना सात लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

आमदाराने दिली वनअधिकाऱ्याच्या कानशिलात
आज, गुरुवारी दुपारी महिलेचे शव मिळाल्यानंतर मोहिमेदरम्यान जंगलात पोलीस जेवण करीत होते. यावेळी वाघावर नियंत्रण करण्याऐवजी पोलीस आणि वनअधिकारी जेवण करीत आहेत. आमची महिला ठार झाली व वाघाला पकडण्यात अपयश आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस व वनअधिकाऱ्यांवर दगडफेक केली. यावेळी काही प्रमणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वनअधिकारी अंबाडी माधव यांनी ग्रामस्थांना आवरायला पोलिसांना लाठीमार करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आमदार अरविंद पाटील यांना राग अनावर झाला आणि आमदार पाटील यांनी अंबाडी माधव यांच्या कानाखाली लगावली.

जांबोटी- माजिवडे येथे गुरुवारी जमावाला शांत करताना आमदार अरविंद पाटील, चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी आणि अन्य.

Web Title: Forest officials, police picketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.