वन अधिकाऱ्यांचा हट्ट; कर्मचारी त्रस्त!
By Admin | Updated: September 3, 2014 01:14 IST2014-09-03T01:14:55+5:302014-09-03T01:14:55+5:30
नागपूर वन विभागातील काही वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचा हट्टी स्वभाव कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी चांगलाच मनस्ताप ठरत आहे. यामुळे त्रस्त झालेले काही वन कर्मचारी थेट वरिष्ठांकडे धाव घेऊन, लेखी तक्रारी

वन अधिकाऱ्यांचा हट्ट; कर्मचारी त्रस्त!
नागपूर : नागपूर वन विभागातील काही वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचा हट्टी स्वभाव कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी चांगलाच मनस्ताप ठरत आहे. यामुळे त्रस्त झालेले काही वन कर्मचारी थेट वरिष्ठांकडे धाव घेऊन, लेखी तक्रारी करू लागले आहेत. अशाच पी. डी. भोयर नामक वनपाल कर्मचाऱ्याने राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांसह (वनबलप्रमुख), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे (वन्यजीव) तक्रार केली आहे.
भोयर यांनी आपल्या तक्रारीतून पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षकांनी त्यांची वैद्यकीय रजा नामंजूर करून, अडीच महिन्यांचे वेतन व भत्ते रोखल्याचे गाऱ्हाणे मांडले आहे. विशेष म्हणजे, सध्या ते रामटेक वन परिक्षेत्रातील गस्ती पथकात असून, यापूर्वी मात्र वन्यजीव विभागातील चोरबाहुली वन परिक्षेत्रात वनपाल पदावर कार्यरत होते. दरम्यान, गत १७ डिसेंबर २०१३ रोजी त्यांची अचानक प्रकृती खराब झाली.
परंतु त्यावेळी ते चोरबाहुली येथील जंगलात असल्याने, त्यांना संपूर्ण रात्र तेथेच काढावी लागली. परंतु दुसऱ्या दिवशी १८ डिसेंबर रोजी त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. येथे त्यांनी उपचार घेतल्यानंतर त्यासंबंधीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह चोरबाहुली येथील वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे वैद्यकीय रजेचा अर्ज सादर केला. तसेच त्यासंबंधी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक कार्यालयालाही माहिती देण्यात आली. यानंतर डॉक्टरांनी त्यांना दीर्घ रजा घेऊन, काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला. त्यावर भोयर यांनी वन्यजीव विभागाकडे वैद्यकीय रजेसाठी पुन्हा रीतसर अर्ज केला. तसेच वेळोवेळी वैद्यकीय अहवालही सादर केले. मात्र असे असताना, वनपाल भोयर आजारातून बरे झाल्यानंतर वरिष्ठांकडे वैद्यकीय रजा मंजुरीसाठी गेले असता, त्यांना तुमच्या सर्व रजा नामंजूर करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय रजा हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क असताना, संबंधित अधिकाऱ्याच्या निर्णयामुळे भोयर यांना अडीच महिन्याचे वेतन व भत्त्यांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ते गत सात महिन्यांपासून या विभागाचा उंबरठा झिजवीत आहेत. परंतु तरीही अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही. शेवटी त्यांनी वरिष्ठांकडे धाव घेऊन, न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. (प्रतिनिधी)