वन विभागाच्या ट्रँक्वीलायझर गन धूळ खात पडून
By Admin | Updated: July 6, 2014 00:45 IST2014-07-06T00:29:27+5:302014-07-06T00:45:26+5:30
वन विभागाकडे ट्रँक्विलायझर गन (जनावरांना बेशुद्ध करणारी बंदूक) पडून असून, केवळ अकोला वन्यजीव विभागातच या गनचा वापर करण्यात येत आहे.

वन विभागाच्या ट्रँक्वीलायझर गन धूळ खात पडून
अकोला : गत काही महिन्यांपासून बिबट, अस्वलासारखे वन्यप्राणी गावात शिरून गावकर्यांवर हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा स्थितीत पश्चिम वर्हाडातील जिल्हय़ांमध्ये वन विभागाकडे ट्रँक्विलायझर गन (जनावरांना बेशुद्ध करणारी बंदूक) पडून असून, केवळ अकोला वन्यजीव विभागातच या गनचा वापर करण्यात येत आहे.
अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्हय़ांमध्ये वन खात्याचे दोन उपविभाग असून, दहापेक्षा जास्त रेंज आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्र शेकडो किमी पसरलेले आहे; मात्र तीनही जिल्हे मिळून केवळ अकोला येथील वन्यजीव विभागातील ट्रँक्विलायझर गनचाच वापर होत आहे. अन्य कार्यालयांमध्ये ट्रँक्विलायझर गन असल्या, तरी त्याचा वापर करण्यात येत नाही. तीनही जिल्हय़ात कुठेही वन्यप्राणी विहिरीत पडले किंवा गावात शिरून गावकर्यांवर हल्ला केला, तर अकोल्याहून पथक पाठविण्यात येते. बुलडाणा येथे बिबट्यासारख्या वन्यप्राण्याने हल्ला केला, तर तेथे अकोला येथून पथक पोहोचण्यासाठी तीन तास लागतात. तोपर्यंत अनेक जण जखमी होऊ शकतात किंवा मृत्यूमुखीही पडू शकतात. गत महिन्यात बुलडाणा जिल्हय़ातील नांदुरा येथे बिबट्याने गावात शिरून गावकर्यांवर हल्ला केला होता. नांदुरा येथे अकोला येथून पथक पोहोचण्यासाठी दोन तास लागले. या वेळात बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला होता. गत काही वर्षांपूर्वी वन विभागाला ट्रँक्विलायझर गन देण्यात आल्या होत्या; मात्र या गनचा वापर होत नसून, त्या तशाच पडून आहेत. तीन जिल्हय़ात कोठेही वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली, तर अकोला येथूनच पथक पाठविण्यात येते. वन विभागाने प्रत्येक वन परिक्षेत्र अधिकार्याला रिव्हॉल्वर दिली आहे.