ठार केलेल्या वाघावरुन वन विभागच संभ्रमात
By Admin | Updated: August 24, 2014 01:07 IST2014-08-24T01:07:23+5:302014-08-24T01:07:23+5:30
१९ आॅगस्टला गोळ्या घालून ठार मारलेला वाघ नरभक्षीच होता का? यावरून वनविभागाचा पुरता गोंधळ उडाला आहे. वन विभागाचे अधिकारी वाघाला ठार मारण्याचे समर्थन करीत आहेत.

ठार केलेल्या वाघावरुन वन विभागच संभ्रमात
गोंधळात भर : अधिकारी व वनमंत्र्यांचे परस्परविरोधी वक्तव्य
चंद्रपूर : १९ आॅगस्टला गोळ्या घालून ठार मारलेला वाघ नरभक्षीच होता का? यावरून वनविभागाचा पुरता गोंधळ उडाला आहे. वन विभागाचे अधिकारी वाघाला ठार मारण्याचे समर्थन करीत आहेत. तर खुद्द याच खात्याच्या मंत्र्यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘वाघाला ठार मारणे हा एक अपघात होता’, असे वक्तव्य केल्याने संशय वाढला आहे.
चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वन संरक्षक संजय ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन वनविभागाची बाजू मांडली होती. त्यात त्यांनी वाघाला ठार करण्याच्या कृतीचे समर्थन करीत पोंभूर्णा तालुक्यात घडलेल्या सातपैकी सहा घटनांमध्ये माणसांना मारणारा वाघ एकच होता, असा दावा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी पुराव्यादाखल घटनास्थळावरील छायाचित्रे आणि व्हिडीओ फुटेजही सादर केले होते. वन अधिकारी आपली बाजू मांडत असताना सांगलीतील पत्रकार परिषदेत वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी संबंधित वाघ नरभक्षी होता किंवा नाही हे अस्पष्ट असल्याचे सांगितले आहे. वाघाला नरभक्षक ठरवून गोळ्या घालणे हा अपघात होता. नेमबाजांनी केवळ स्वत:च्या सुरक्षेसाठी वाघावर गोळीबार केला, असे वक्तव्य त्यांनी केल्याने या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वनविभागात अधिकारी आणि मंत्रीस्तरावर हा गोंधळ सुरु असताना वाघाला ठार करण्याच्या कृतीवरून जिल्ह्यातही बरीच ओरड सुरू आहे. १९ तारखेच्या सायंकाळी ठार करण्यात आलेला वाघ आणि सातही व्यक्तींना मारणारा वाघ एकच आहे, असा दावा वनविभाग करीत असला तरी परिसरातील जनता आणि वन्यजीवप्रेमी यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. हल्ल्याच्या सातपैकी पाच घटना वन विकास महामंडळाच्या हद्दीत तर दोन घटना प्रादेशिक वनविभागाच्या क्षेत्रात घडल्या आहेत.
वनविकास महामंडळाचे अधिकारीही आपल्या क्षेत्रात हल्ले करणारा हा वाघ नव्हे असे खाजगीत म्हणत आहेत. भटारी, देवई, बेरडी, पोंभूर्णा आदी गावातील गावकऱ्यांनी हल्ल्यानंतर वाघाला पाहिले आहे. ते सुद्धा मारलेला वाघ हल्लेखोर नव्हे, असे सांगत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
पगमार्कवरूनही संशयाचे वातावरण
ठार करण्यात आलेल्या वाघाचे पगमार्क व हल्ल्याच्या दिवशी घेतलेल्या वाघाचे पगमार्क एकमेकांसोबत जुळत नसल्याचीही माहिती आहे. वाघाची ओळख पटविण्यात पगमार्क महत्वाचे मानले जातात. मात्र वनविकास महामंडळ आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये यावरून मतभेद दिसत आहेत. अलीकडच्या काळात पगमार्क हा पुरावा महत्वाचा नसून अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने मिळविलेल्या माहितीचा आधार महत्त्वाचा समजला जातो, असे सांगत संजय ठाकरे यांनी पगमार्कऐवजी छायाचित्रांच्या पुराव्यावर अधिक भर दिला आहे. मात्र मारलेला वाघ वनविकास महामंडळाच्या हद्दीतील नसल्याची खाजगी चर्चा महामंडळाचेच अधिकारी करीत असल्याने संभम्र पसरला आहे. वनजीव प्रेमींनीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.