परवानगीनंतरच विदेशी मद्याचे दर कमी होणार; अन्य राज्यांतून मद्य आणल्यास कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:11 AM2021-11-22T11:11:51+5:302021-11-22T11:13:21+5:30

सरकारने विशेष शुल्कात मोठी कपात केली आहे. आता कंपन्यांना त्यांची स्वतःची किंमत जाहीर करावी लागेल. जाहीर केलेल्या किमतीची यादी त्यांना आयुक्तांकडे द्यावी लागेल.

Foreign liquor prices will fall only after permission; Action if alcohol is imported from other states | परवानगीनंतरच विदेशी मद्याचे दर कमी होणार; अन्य राज्यांतून मद्य आणल्यास कारवाई

परवानगीनंतरच विदेशी मद्याचे दर कमी होणार; अन्य राज्यांतून मद्य आणल्यास कारवाई

googlenewsNext

अतुल कुलकर्णी -

मुंबई : राज्य सरकारने १८ नोव्हेंबरपासून परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला असला तरी, आयात करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे निर्मिती शुल्क उत्पादन शुल्क विभागाकडे सादर करावे लागेल. त्यांच्या मान्यतेनंतर विदेशी मद्याची किंमत निश्चित केली जाईल. हे काम या आठवड्यात पूर्ण होईल, असे उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

सरकारने विशेष शुल्कात मोठी कपात केली आहे. आता कंपन्यांना त्यांची स्वतःची किंमत जाहीर करावी लागेल. जाहीर केलेल्या किमतीची यादी त्यांना आयुक्तांकडे द्यावी लागेल. त्यांच्या परवानगीनंतर एमआरपी निश्चित होईल. प्रत्येक कंपन्यांना नवीन बदल कळविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून येत्या दोन-तीन दिवसांत याद्या येतील आणि मान्यतेनंतर महाराष्ट्रात देखील मद्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर कमी होतील, असेही उमाप यांनी सांगितले.

लोकप्रिय ब्रँडची  ७५० मिलिलिटर दारूच्या बाटलीची किंमत महाराष्ट्रात जर ५,७६० रुपये असेल, तर गोवा आणि दिल्लीमध्ये त्याची किंमत २,८०० रुपये आहे, तर चंदीगडमध्ये हीच दारू २,२०० रुपयांना मिळते. कराच्या या बोजामुळे महाराष्ट्रात दारू विकत घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. शिवाय दारूमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करून ती विकली जाते. भेसळीची दारू पिणाऱ्याला गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. महसुली उत्पन्नावरही परिणाम होतो. महसुली उत्पन्नापेक्षा महत्त्वाचा मुद्दा जनतेच्या आरोग्याचा आहे, असे सांगून एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, या निर्णयामुळे आयात मद्याचे दर कमी होऊन इतर राज्यांच्या बरोबरीत येतील. दर कमी झाल्यामुळे तस्करीला आळा बसेल. 

परदेशातून येताना दोन लिटर दारू तुम्हाला आणता येते. मात्र भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दारूची ने-आण करता येत नाही. कायद्याने तो गुन्हा ठरतो. अनेक लोक दिल्ली, गोवा येथे दारू स्वस्त मिळते म्हणून तेथून घेऊन येतात. हे थांबवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने येत्या काही दिवसांत राज्यात मोठी मोहीम राबवली जाणार आहे. बाहेरून दारू आणणाऱ्यांवर प्रसंगी गुन्हे देखील दाखल केले जातील, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 महागड्या ब्रँडचे दर -
राज्य/प्रदेश    किंमत
महाराष्ट्र - ५,७६०/-
चंदीगड - २,२००
दिल्ली - २,८००
पश्चिम बंगाल - ३,५०० 
गोवा    - २,८००
दीव-दमण     - ३,०००
 

Web Title: Foreign liquor prices will fall only after permission; Action if alcohol is imported from other states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.