‘जय जवान’च्या याचिकेला सेनेचे बळ
By Admin | Updated: August 24, 2016 03:22 IST2016-08-24T03:22:15+5:302016-08-24T03:22:15+5:30
प्रताप सरनाईक यांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकेला पाठबळ देत हंडीवरील निर्बंध कायदेशीर मार्गाने शिथिल करवून घेण्याची धडपड सुरु ठेवली

‘जय जवान’च्या याचिकेला सेनेचे बळ
ठाणे : नऊ थरांची हंडी आणि ११ लाखांचे बक्षिस लावून न्यायालयीन आदेशांना आव्हान देण्याचा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असतानाच शिवसेना आमदार व दहीहंडीचे आयोजक प्रताप सरनाईक यांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकेला पाठबळ देत हंडीवरील निर्बंध कायदेशीर मार्गाने शिथिल करवून घेण्याची धडपड सुरु ठेवली आहे.
मनसेने ठाण्यात ठिकठिकाणी नऊ थरांच्या हंडीचे फलक लावले आहेत. मनसेने आपली सर्व कुमक ठाण्यातील दहीहंडी यशस्वी करण्याकरिता उतरवली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित केले आहे. त्याचवेळी संस्कृती युवा प्रतिष्ठानचे प्रमुख प्रताप सरनाईक यांनी, बुधवारी जय जवान गोविंदा पथकाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेचा सर्व खर्च करणार असल्याची घोषणा केली.
यंदाच्या दहीहंडी उत्सवात कोणत्याही प्रकारची थरांची स्पर्धा करणार नसल्याचे खा. राजन विचारे आणि आ. सरनाईक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत सांगितले.
आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवात चार थरांच्यावर थर लावले जाणार नसल्याचे खा. विचारे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून आमच्या दहीहंडी उत्सवात चार थरांच्यावर थर लावले जात नाहीत. आम्ही जीवघेणी स्पर्धा करीत नाही.
हिंदूच्या सणांवरील निर्बंधांना विरोध
हिंदुस्थानात हिंदूंचे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे झाले पाहिजे. राज्य सरकार बाजू मांडण्यात कमी पडले आहे. हिंदूंच्या सणांवर निर्बंध का येतात. एकीकडे या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला असताना दुसरीकडे या उत्सवावर आणलेले निर्बंध चुकीचे आहेत. गोविंदांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही आयोजकांची जबाबदारी आहे, असे खा. विचारे यांनी सांगितले.
संस्कृती युवा प्रतिष्ठान यंदा न्यायालयीन नियमांच्या अधीन राहून व राज्य शासनाच्या क्र ीडा खात्याच्या धोरणानुसार दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे, असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. अत्यंत साधेपणाने हा मराठमोळा उत्सव साजरा करून महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>कान्हाचा १० टक्के नफा जखमी गोविंदांना
‘कान्हा’ या आपण प्रदर्शीत केलेल्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून जो नफा होईल त्यापैकी १० टक्के रक्कम यापूर्वी दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांवरील उपचारासाठी देण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.