बनावट दारूच्या कारखान्यावर धाड
By Admin | Updated: August 27, 2014 00:59 IST2014-08-27T00:59:30+5:302014-08-27T00:59:30+5:30
जरीपटक्यातील एका बनावट दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज धाड घालून ब्रॅण्डेड कंपनीचा मोठा बनावट दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी अशोक सुंदरदास अडवाणी

बनावट दारूच्या कारखान्यावर धाड
मोठा साठा जप्त : गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : जरीपटक्यातील एका बनावट दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज धाड घालून ब्रॅण्डेड कंपनीचा मोठा बनावट दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी अशोक सुंदरदास अडवाणी (वय ५१) याला पोलिसांनी अटक केली.
नागपुरातील काही भागात बनावट दारूचे कारखाने अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मध्य प्रदेशात तयार होत असलेली मात्र महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेली दारू नियमित नागपुरात आणली जाते. विशिष्ट रसायन घालून आणि प्रक्रिया करून वेगवेगळी दारू तयार केली जाते. आॅफिसर चॉईस, मॅकडोनाल्ड, रॉयल चॅलेंज तसेच अन्य ब्रॅण्डेड कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरून तिची विक्री केली जाते.
काही बार आणि वाईन शॉपच्या संचालकांना हाताशी धरून या बनावट दारूची राजरोसपणे विक्री होते. बनावट दारू बनविणारे एकीकडे शासनाचा कोट्यवधींचा कर बुडवितात आणि दुसरीकडे मद्यपींच्या आरोग्याशी खेळून यातून कोट्यवधींची कमाई करतात. पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांना याची माहिती आहे. मात्र, महिन्याला मोठी मलाई मिळत असल्यामुळे त्याकडे हे अधिकारी दुर्लक्ष करतात. जरीपटक्यातील कुंगू कॉलनीतील अशोक अडवाणी हा अशीच बनावट दारू तयार करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस आयुक्त के. के.पाठक यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वात पो.नि. ताथोड, सहायक निरीक्षक नरेंद्र पवार, गोकुळ सूर्यवंशी, पीएसआय वहाब, अजीज, हवालदार इसराईल, नरेंद्र चौधरी, राजेश ठाकूर, प्रकाश, शत्रुघ्न कडू, शिपाई मनजित, दयाशंकर, गीता यांनी आज अडवाणीच्या कारखान्यात धडक दिली. तेथे मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा, विविध रसायने पोलिसांना आढळली. ही बनावट दारू वेगवेगळ्या कंपन्यांचे वेष्टण असलेल्या बाटल्यांमध्ये भरली जात होती. सील करण्याचेही उपकरण पोलिसांना आढळले. जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या आणि साहित्याची किंमत १ लाख ४७ हजार रुपये आहे. (प्रतिनिधी)