पोलिसांच्या घरांसाठी पाठपुरावा करणार- सतीश माथुर

By Admin | Updated: August 29, 2016 23:44 IST2016-08-29T22:42:08+5:302016-08-29T23:44:47+5:30

पोलिसांना लवकरात लवकर घरं मिळावी, यासाठीही मी पाठपुरावा करणार

Follow-up for police houses: Satish Mathur | पोलिसांच्या घरांसाठी पाठपुरावा करणार- सतीश माथुर

पोलिसांच्या घरांसाठी पाठपुरावा करणार- सतीश माथुर

डिप्पी वांकाणी/ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच कार्यभार स्वीकारला आहे. लोकमतच्या प्रतिनिधीनं या निमित्तानं त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. सतीश माथुर यांनी अनेक मुद्द्यांवर स्वतःची रोखठोक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, मला 2.5 लाख पोलिसांचं नियोजन करावं लागते. इसिसचं राज्यासमोर मोठं आव्हान असताना सायबर क्राइमही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पोलिसांना लवकरात लवकर घरं मिळावी, यासाठीही मी पाठपुरावा करणार आहे, असं पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी सांगितलं आहे.

पोलिसांची जनमानसात असलेली चुकीची प्रतिमा सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. अनेकदा सामान्य लोक एखादा गुन्हा झाल्यावरही पोलीस स्टेशनला जाणं टाळतात. मात्र पोलीस स्टेशन हे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी असतं, हे लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. लोकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मी पहिल्यांदा प्रयत्न करणार आहे. सण, उत्सवात पोलीस सुट्ट्या न घेता ठरलेल्या कामांच्या तासांहून अधिक वेळ काम करतात. अनेक पोलिसांच्या त्या काळात सुट्ट्याही रद्द होतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पोलिसांच्या सातत्यानं सुट्ट्या रद्द होत आल्या आहेत. पोलीस खात्यात पोलिसांची संख्याही कमी आहे. पोलिसांचा सामाजिक स्तर सुधारण्यासाठी पोलिसांसाठी असलेल्या गृहनिर्माण धोरणात बदल करण्याचीही सरकारकडे मागणी करणार आहे.

सरकारनं पोलिसांना उदारमतवादीपणानं घरांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. उदा. गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांच्या घरांसाठी आलेल्या 500 अर्जांपैकी 250 अर्ज अर्थसंकल्पात पोलिसांसाठी असलेल्या निधीचा अभाव असल्यानं रद्द करण्यात आले होते. त्या धोरणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रधानमंत्री गृह आवास योजनेसाठी पात्र असले पाहिजेत. त्याप्रमाणेच त्यांना दरवर्षी घरखरेदीसाठी 6 टक्क्यांपर्यंत कर्ज दिलं पाहिजे. याबाबत जागरूकता पसरवण्याची गरज असून, पोलिसांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देणं गरजेचं आहे.

आर्थिक आणि सायबर गुन्हे यात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे तपास करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं गुन्हाचा छडा कशा प्रकारे लावता येईल, याचंही प्रशिक्षण पोलिसांना मिळावं, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पोलीस गुन्हेगाराला शोधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून चांगलं शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा मिळणं गरजेचं आहे. पोलीस अतिशय जोखमीचं काम करत असून, सरकारच्या इतर खात्यांशीही समन्वय साधतात.

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या उपद्रवही देशभरात वाढत आहे. मात्र ही नक्षलवादी प्रवृत्ती संपवण्याची गरज आहे. पोलीसही नक्षलवाद्यांशी लढताना अनेकदा जोखीम पत्करतात. सी-60 कमांडो आणि सीआरपीएफचे जवानांनी नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी अनेकदा ऑपरेशन राबवली आहेत आणि ती यशस्वी करून दाखवली आहेत. पवन हंस सारखे चॉपर आपल्याकडे आधीपासून उपलब्ध आहेत. तशाच प्रकारे आणखी हेलिकॉप्टर खरेदी करण्याची गरज आहे. इसिसच्या वाढत्या प्रभावावरही सतीश माथुर यांनी चिंता व्यक्त केली असून, दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Web Title: Follow-up for police houses: Satish Mathur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.