फॉरवर्डिंगपेक्षा नवनिर्मितीवर भर द्यावा
By Admin | Updated: December 31, 2016 03:05 IST2016-12-31T03:05:03+5:302016-12-31T03:05:03+5:30
फेसबुक, ट्विटर आदी सोशल साईटस्वर वावरणाऱ्या स्वयंसेवकांनी आलेले मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा नवी माहिती, नवा विचार मांडण्यावर भर द्यायला हवा. योग्य शब्दांत

फॉरवर्डिंगपेक्षा नवनिर्मितीवर भर द्यावा
मुंबई : फेसबुक, ट्विटर आदी सोशल साईटस्वर वावरणाऱ्या स्वयंसेवकांनी आलेले मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा नवी माहिती, नवा विचार मांडण्यावर भर द्यायला हवा. योग्य शब्दांत आणि भाषेत आपले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी केले.
मुंबईतील संघ कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी सहप्रचार प्रमुख नंदकुमार, कोकण प्रांत प्रचार प्रमुख प्रमोद बापट उपस्थित होते. संघाचे अनेक स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने सोशल मीडियात कार्यरत आहेत. याशिवाय चार वर्षांपासून सोशल मीडिया सेलद्वारेही संघाची माहिती आणि भूमिका मांडण्याचे काम केले जाते. मात्र आपली भूमिका मांडताना कायम सयंत भाषेचा वापर करावा. असभ्य भाषेचा वापर करू नये. केवळ माहिती फॉरवर्ड करत राहण्यापेक्षा स्वत:चे विचार मांडण्यावर भर द्यावा, अशी संघाची भूमिका असते. याच भूमिकेवर संघाच्या सोशल मीडिया सेलचे काम चालते, असे मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी शिवराळ भाषेचा वापर होतो, हा आरोप वैद्य यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ज्यांचा अभ्यास नाही मात्र हिंदुत्वाबाबत आस्था आहे अशी मंडळी प्रतिवादासाठी शिवराळ भाषेचा वापर करतात. स्वयंसेवकांकडून असे प्रकार घडत नाहीत, असा दावाही मनमोहन वैद्य यांनी केला. जे कधी शाखेवरही गेले नाहीत ते स्वयंसेवक कसे असू शकतील, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. संघाचे विचार आणि संघाबाबतची माहिती प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजधानी दिल्लीत सोशल मीडिया सेल कार्यरत आहे. त्याशिवाय प्रत्येक प्रांतात, विभागात आणि काही ठिकाणी जिल्हास्तरावरही स्वयंसेवक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडत असतात. विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण, माजी सरसंघचालकांचे विविध विषयांवरील भाष्य आणि चिंतन सोशल मीडियाच्या मांडण्यावर आमचा भर असतो. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अलीकडे मुख्य प्रवाहातील माध्यमांनी सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण थेट प्रसारित करण्यास सुरुवात केली असल्याचा दावा सहप्रचार प्रमुख नंदकुमार यांनी केला. (प्रतिनिधी)
नोटाबंदीचा आमच्यावर काही परिणाम नाही
केंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा संघावर काही परिणाम झाला नाही. संघाकडे गुरुदक्षिणेच्या माध्यमातून येणारा निधी लागलीच बँकेत जमा केला जातो.
काही महिन्यांपूर्वीच संघाने स्वयंसेवकांसाठी सुमारे ६ लाख ५० हजार फुल पँट वितरित केल्या. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर ही विक्री करण्यात आली. तेव्हाही चेकद्वारे पैसे घेण्याची सूचना भांडार विभागाला देण्यात आली होती, असे मनमोहन वैद्य यांनी सांगितले.