चिमुकल्यांसाठी ‘फोक टू फार्म’ अनोखा उपक्रम
By Admin | Updated: July 31, 2016 01:44 IST2016-07-31T01:44:18+5:302016-07-31T01:44:18+5:30
विद्यार्थ्यांना शेती व्यवसाय आणि त्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अधिक माहिती व्हावी यासाठी ‘फोक टू फार्म’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले

चिमुकल्यांसाठी ‘फोक टू फार्म’ अनोखा उपक्रम
मुंबई : विद्यार्थ्यांना शेती व्यवसाय आणि त्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अधिक माहिती व्हावी यासाठी मुलुंडच्या सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मिडीयम स्कूलने ‘फोक टू फार्म’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाबाबत अधिक माहिती व्हावी यासाठी शाळेने हा अभिनव उपक्रम राबविला. या वेळी विद्यार्थ्यांना शेतात घेतली जाणारी विविध पिके कोणती?, शेतीमध्ये शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करतो? अशा शेती व्यवसायाविषयीचे अनेक धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांच्या वतीने कृषिभूषण पुरस्कार विजेते श्रीराम गाढवे, नीलेश काळे, विशाल लांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या खडतर जीवनाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याचा सल्ला गाढवे यांनी दिला.
या उपक्रमांतर्गत शेतात पिकणारी ताजी भाजी थेट विद्यार्थी आणि पालकवर्गाला स्वस्त दरात देण्यात आली. त्यामुळे येथे आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतही झाली. शाळेची पालक - शिक्षक संघटना आणि शॉप फॉर चेंज या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शहरी विद्यार्थ्यांची फोक टू फार्म या उपक्रमांतर्गत ग्रामीण जीवनाशी नाळ जोडली जावी’ या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी दिली. (प्रतिनिधी)