पोलीस सक्षम करण्यावर भर!

By Admin | Updated: November 20, 2014 03:50 IST2014-11-20T03:50:09+5:302014-11-20T03:50:09+5:30

पोलीस सक्षम करण्यावर भर!

Focus on enabling police! | पोलीस सक्षम करण्यावर भर!

पोलीस सक्षम करण्यावर भर!

मुंबई : दहशतवाद, नक्षलवादापासून सर्वच आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सक्षम करण्यावर आपल्या सरकारचा भर असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस मुख्यालयात दिली. याचवेळी पोलीस दलातील आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा चटकन व त्या-त्या पातळीवर निपटारा व्हावा यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरणाचे संकेतही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस यांनी बुधवारी पोलीस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या अडचणी जाणून घेतल्या. या अडचणींवर मात करण्यासाठी कोणते उपाय योजता येतील, हेही त्यांनी जाणून घेतले. मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृहविभागाचे अप्पर सचिव अमिताभ राजन, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रविण दीक्षित, दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख हिमांशू रॉय, राज्याचे अप्पर महासंचालक देवेन भारती तसेच मुंबईसह अन्य शहरातील आयुक्त, जिल्ह्याचे अधीक्षक, निरनिराळया केंद्रांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, गुन्ह्यांची उकल, गस्त, गुन्हेगारांचा प्रतिकार करताना आवश्यक असलेली अद्ययावत उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा असलेली उपकरणे दुरूस्त करण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद अपुरी पडते. तसेच हे प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी अवाढव्य, वेळकाढू प्रक्रिया अस्तित्वात आहे.
उपकरणांच्या खरेदी तसेच दुरुस्तीसाठी मुंबई पोलीस दलाला वर्षाकाठी ५० हजार रुपयांची तरतूद आहे. शहरात ९३ पोलीस ठाणी आहेत; शिवाय गुन्हे शाखा आणि अन्य विशेष पथके आहेत. त्यात ही तरतूद विभागली तर हजार रुपयेही प्रत्येकाच्या वाट्याला येत नाहीत. त्यामुळे येत्या काळात पोलीस दलाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाईल. तसेच आर्थिक किंवा प्रशासकीय बाबींसाठी त्या-त्या पातळीवर अधिकार दिल्यास निर्णय चटकन घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Focus on enabling police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.