पनवेलमध्ये चक्का जाम; बाजारपेठेत खरेदीला उधाण

By Admin | Updated: September 5, 2016 02:32 IST2016-09-05T02:32:46+5:302016-09-05T02:32:46+5:30

तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Flyover in Panvel; Buy in the market | पनवेलमध्ये चक्का जाम; बाजारपेठेत खरेदीला उधाण

पनवेलमध्ये चक्का जाम; बाजारपेठेत खरेदीला उधाण


पनवेल : तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खरेदीसाठी जमलेल्या ग्राहकांमुळे पनवेलमधील सर्वच रस्ते चक्का जाम झालेले पाहावयास मिळाले. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी विविध प्रकारच्या खरेदीसाठी ही गर्दी ओसंडली होती.भाजी मार्केट, सराफ बाजार, बस स्थानक यासह पनवेल रेल्वे स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली.
विशेष म्हणजे बस डेपो, रेल्वे स्थानकावर देखील कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांनी एकच गर्दी केलेली पाहावयास मिळाली. मुंबई - गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था पाहता अनेकांनी रेल्वे मार्गे कोकणात जाण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. यामुळेच कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहावयास मिळाली. रेल्वे स्थानकावर झालेली गर्दी पाहता रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची चढाओढ पाहावयास मिळाली. पनवेल शहर व परिसरात यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहावयास मिळाला. शहरामध्ये झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडालेली यावेळी पाहावयास मिळाली. (प्रतिनिधी)
गणेशोत्सवानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असून गणेश मंडळांकडून करण्यात आलेली रोषणाई, आकर्षक देखाव्यांमुळे वातावरणात प्रसन्नता जाणवत आहे. शहरात रविवारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी डेकोरेशन, पूजेचे साहित्य, नवीन कपडे आदींच्या खरेदीसाठी गणेशभक्तांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, धान्याची दुकाने यासह रस्त्यावर मिळणारे गणेशचतुर्थीचे साहित्य खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारणीचे संपूर्ण काम रविवारी पूर्णत्वास नेले आहे. घरात दीड दिवसाचा गणपती असणाऱ्यांनी रविवारी रात्रीच मूर्तीशाळांमधून श्रीमूर्ती घरी नेली. पहाटे विधिवत पूजनाने गणेशाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी सायंकाळी या दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. गणेशचतुर्थीनिमित्त रविवारी मिठाईच्या दुकानांमध्ये गोडधोड खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे पुढील अकरा दिवस उत्साहाचे व धार्मिक वातावरण असणार आहे. चिक्कमोत्याची माळ, गणपती राया, आधी वंदू तुज मोरया, अशी गणेशगीते गणेशोत्सवात घरोघरी ऐकू येणार आहेत.
आपल्या लाडक्या ‘बाप्पा’चे सोमवारी आगमन होणार आहे. डोक्याला ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी अक्षरे लिहिलेली कापडी पट्टी बांधून व टोपी घालून बालचमूंसह आबालवृद्धांपर्यंत सर्वच जण ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत आपल्या बाप्पाला घरी नेणार आहेत.
पनवेल शहरात रविवारी संपूर्ण दिवसभर वाहनांच्या रस्त्यांवर लांब रांगा लागल्या होत्या; त्यामुळे बाजार परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत होती. बाजारात चतुर्थीच्या पूजेचे, सजावटीचे, नैवेद्याचे साहित्य, गणपतीला घातली जाणारी विविध आभूषणे, माळा, हार आदी खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस देखील तैनात करण्यात आले होते. वाहतूक नियंत्रण करताना मात्र पोलिसांची मोठी दमछाक होताना दिसत होती.

Web Title: Flyover in Panvel; Buy in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.