राज्यात मुसळधार, अनेक नद्यांना पूर
By Admin | Updated: August 1, 2016 04:16 IST2016-08-01T04:16:05+5:302016-08-01T04:16:05+5:30
पुष्य नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत मुंबई, ठाण्यासह कोकणात जोरदार हजेरी लावली.

राज्यात मुसळधार, अनेक नद्यांना पूर
औरंगाबाद/पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने पुष्य नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत मुंबई, ठाण्यासह कोकणात जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात सर्वदूर पाऊस झाला.
विशेषत: तहानलेल्या लातूर आणि उस्मानाबादमध्येही जोरदार सरी बरसल्याने शेतकरी सुखावला आहे. लातूरची मांजरा, तेरणा, घरणी, रेणा नद्या दोन वर्षांत प्रथमच दुथडी भरून वाहायला लागल्या आहेत. धरणांचा पाणीसाठा वाढल्याने शहराला नळाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. राज्यातील धरणांच्या साठ्यातही मोठी वाढ झाली आहे.
नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यात हलक्या सरी बरसल्या. विदर्भातही संततधार सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील २५
महसूल मंडळांत ६५ मि.मी.पेक्षा
अधिक पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात
अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्याखाली
गेली. हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत प्रत्येकी एक असे दोघे पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात सरासरी १८़१० मिमी पाऊस झाला. जालना, परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस झाला.
मुंबई, ठाण्यात पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर हलक्या सरी झाल्या. सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला. सातारा
जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले.
गेल्या २४ तासांत विदर्भात चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणचे नदी, ओढे, नाले भरभरून वाहत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>मराठवाड्याला दिलासा
नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने जलसाठा
८० टक्क्यांपर्यंत वाढला. दिवसभरात दोन टप्प्यांत धरणातून दोन हजार ७४० क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला. धरणातून पाणी सोडल्याने मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे.
लातूरला नळाने पाणी देणार
लातूरला तब्बल साडेसहा महिन्यांनंतर नळाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मांजरा नदीवरील साई, नागझरी, पोहरेगाव, वांजरखेडा बॅरेजेसमध्ये पाणी साठल्याने महापालिकेकडून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुसळधार पावसाचा इशारा
पुढील तीन-चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.