फ्लेक्सवरील फोटोमुळे लुटारू जेरबंद
By Admin | Updated: November 7, 2016 23:18 IST2016-11-07T23:18:36+5:302016-11-07T23:18:36+5:30
चौघांनी या जोडप्यास मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चेन लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली.

फ्लेक्सवरील फोटोमुळे लुटारू जेरबंद
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 7 - मुंबई येथे नोकरीस असलेल्या आणि दिवाळीनिमित्त अकोल्यात आल्यानंतर वाग्दत्त वधूसोबत खरप परिसरातून जात असताना या परिसरातील रहिवासी असलेल्या चौघांनी या जोडप्यास मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चेन लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणातील वाग्दत वर हा सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी खरप येथून परत निघाला असता त्याला न्यू तापडीया नगरजवळ लावलेल्या शुभेच्छा फलकावर दोन लुटारुंचे छायाचित्र दिसले, तक्रारी सोबतच ही माहिती सिव्हील लाईन्स पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी फलकावरील दोघांची ओळख पटवून यामधील एकाला अटक केली असून तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.
कार्ला येथील रहिवासी विवेक वानखडे हे मुंबई येथे प्लंबिंग वर्क्सचे कामकाज करतात. त्यांचे अकोल्यातीलच एका मुलीसोबत साक्षगंध झाले असून दोन महिन्यांनी विवाह सोहळा आहे. वानखडे दिवाळीला अकोल्यात आल्यानंतर ते त्यांच्या वाग्दत्त वधूला घेऊन खरप परिसरातून जात असताना त्यांना खरप येथील रहिवासी संजय अवधूत इंगळे, राष्ट्रपाल व त्यांच्या दोन साथीदारांनी अडविले. त्यानंतर शस्त्र आणि पाइपचा धाक दाखवून विवेक वानखडे यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेतली. त्यानंतर पर्स घेऊन त्यामधील १ हजार रुपये रोख, एटीएम कार्ड, नेट बँकिंगचे पासवर्ड आणि वाहन चालक परवाना काढून घेतला. यासोबतच त्यांना पाठीवर व चेहऱ्यावर मारहाण केली. लूटमार केल्यानंतर हे चोरटे फरार झाले. त्यानंतर वानखडे वानखडे हे सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी खरप येथून परत निघाले असता त्यांना न्यू तापडीया नगरजवळ लावलेल्या शुभेच्छा फलकावर दोन लुटारुंचे छायाचित्र दिसले, या प्रकाराची माहिती सिव्हील लाईन्स पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी फलकावरील दोघांची ओळख पटवून यामधील संजय इंगळे याला अटक केली, तर राष्ट्रपाल नामक लुटारुचा शोध सुरु केला आहे. वाढदीवस शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फलकावर लुटारुंचे छायाचित्र लावलेले असल्याने या लुटमारीचा काही वेळातच पर्दाफाश झाला.