सरसकट सावकारी कर्जमाफी
By Admin | Updated: March 14, 2015 05:05 IST2015-03-14T05:05:19+5:302015-03-14T05:05:19+5:30
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील खासगी सावकारांचे कर्ज सरसकटपणे राज्य शासन परतफेड करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

सरसकट सावकारी कर्जमाफी
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील खासगी सावकारांचे कर्ज सरसकटपणे राज्य शासन परतफेड करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. गुरुवारी विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी सावकारी कर्जमाफीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला होता. हिवाळी अधिवेशनात सरकारने सावकारी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात याबाबत कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळबाधितांचे खासगी सावकारांकडील कर्ज राज्य सरकारने भागवण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा राज्यातील २३८११ गावांत टंचाईसदृशस्थिती आहे. या सर्व गावातील शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खासगी सावकारांकडील सरसकट कर्जाची परतफेड सरकार करणार आहे. याबाबत गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे कर्ज असले तरी त्याची परतफेड शासन करणार आहे.
राज्यातील तब्बल २० हजार गावांना सातत्याने टंचाईची झळ सोसावी लागते. ही दुष्काळीस्थिती तसेच उत्पादकतेतील घट शेतकरी आत्महत्यांमागील प्रमुख कारण आहे. यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. या योजनेत आतापर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातून राज्यातील १४ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)