प्रवेशासाठी सहा वर्षांची अट निश्चित
By Admin | Updated: November 4, 2014 02:38 IST2014-11-04T02:38:08+5:302014-11-04T02:38:08+5:30
पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशाचे वय किती असावे, याबाबतही विस्तृत सूचना केली आहे.

प्रवेशासाठी सहा वर्षांची अट निश्चित
पुणे : पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील प्रवेशाचे वय निश्चित करण्यासाठी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचा अहवाल शासनास सादर केला असून, सहा वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीत प्रवेश द्यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशाचे वय किती असावे, याबाबतही विस्तृत सूचना केली आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड व त्रिपुरा या राज्यांमध्ये पहिलीच्या प्रवेशाचे वय सहा वर्षे आहे. उर्वरित राज्यांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट पाच वर्षे आहे. परंतु, महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक वर्ग व प्राथमिक वयाबाबत कोणतीही विहीत वयोमर्यादा अथवा निकष अस्तित्वात नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वयाची निश्चिती करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती.
राज्यात राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. परंतु, ३१ जुलै रोजी संबंधित विद्यार्थ्याचे वय किती आहे, हे विचारात घेऊन शाळांनी प्रवेश द्यावा, असे या अहवालात म्हटले आहे. राज्यामध्ये पहिलीच्या प्रवेशाचे वय एकदम ६ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक केल्यास अनेक शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात. परिणामी पटसंख्येअभावी शिक्षक अतिरिक्त होतील. त्यामुळे एकदम प्रवेशाची वयोमर्यादा न वाढविता टप्प्याटप्प्याने दोन वर्षांमध्ये ही वयोमर्यादा वाढविली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-१६मध्ये ५ वर्षे व ६ महिने पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. तर २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून ६ वर्षे पूर्ण झालेल्यांना प्रवेश दिला जावा, असे अहवालात स्पष्ट केले. (प्रतिनिधी)