साखरेच्या भावात पाच वर्षांचा नीचांक
By Admin | Updated: March 24, 2015 23:46 IST2015-03-24T23:46:57+5:302015-03-24T23:46:57+5:30
साखर कारखान्यांत बंपर साठा, त्या तुलनेत विक्री कमी. परिणामी, साखरेने मागील पाच वर्षांचा नीचांक गाठला आहे. होलसेलमध्ये २,४०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली जात आहे.

साखरेच्या भावात पाच वर्षांचा नीचांक
औरंगाबाद : साखर कारखान्यांत बंपर साठा, त्या तुलनेत विक्री कमी. परिणामी, साखरेने मागील पाच वर्षांचा नीचांक गाठला आहे. होलसेलमध्ये २,४०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली जात आहे.
एकीकडे साखरेच्या उत्पादनात २५ टक्क्यांनी वृद्धी झाली असताना बाजारात मागणी घटली आहे. खरेदी-विक्रीतील या विरोधाभासाने साखरेचे भाव घटले आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये साखरेचा हंगाम सुरू झाला, तेव्हा साखर एस (बारीक दाणा) २,९५० रुपये, सुपर एस (मध्यमदाणा)- ३,०५० रुपये तर एम (जाड दाणा) ३,१५० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली होती.
साडेचार महिन्यांत साखर क्विंटलमागे ५५० ते ६५० रुपयांनी भाव कमी होऊन २४ मार्च २०१५ रोजी एस २,४०० रुपये, सुपर एस २,४५० रुपये, तर एम २,५०० रुपयांनी विक्री केली जात होती.
राज्यात १७० कारखान्यांनी ७ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप करून ८ कोटी ४० लाख क्विंटल साखर तयार केली. त्यापैकी औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांनी ६६ लाख ७३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले व ६७ लाख क्विंटल साखर तयार केली. मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन २५ टक्क्यांनी वाढले आहे. यासंदर्भात साखरेचे दलाल राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, जगात साखर उत्पादनात ब्राझील नंबर एकचा देश आहे. तिथे यंदा इथिनॉल तयार न करता साखर उत्पादनावरच भर देण्यात आला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव गडगडले आहेत. आपल्या देशात साखरेच्या बंपर उत्पादनामुळे या मंदीत आणखी भर पडली आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कच्च्या साखरेवर सबसिडी दिली होती.
यंदा पाच महिने उशिरा म्हणजे फेब्रुवारीअखेरीस सबसिडी देण्यात आली आहे. परिणामी, साखर कारखान्यांनी कच्ची साखर कमी प्रमाणात तयार केली व पक्क्या साखरेचे उत्पादन अधिक केले.
साखरेचे होलसेल विक्रेते संजय लोहाडे यांनी सांगितले की, १ जानेवारी २०१० रोजी साखर ३,९०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली होती. २४ मार्च २०१५ रोजी २,४०० तर २,५०० रुपयांनी विक्री झाली. हा भाव मागील ५ वर्षांतील साखर विक्रीतील नीचांक ठरला आहे.
४साखरेच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरात उन्हाळ्यात दररोज २,५०० क्विंटल साखर विक्री होत असते. मात्र, यंदा साखरेचे भाव घटल्याने खरेदीदारांनी हात आखडता घेतला आहे. परिणामी, सध्या दैनंदिन १,६०० ते १,७०० क्विंटलच साखर विक्री होत आहे.