पाच हजार कोटींची फसवणूक
By Admin | Updated: July 30, 2014 01:18 IST2014-07-30T01:18:10+5:302014-07-30T01:18:10+5:30
गेल्या चार ते पाच वर्षांत नागपुरातील हजारो लोकांच्या ठेवी हडप करणाऱ्या ठगबाजांची यादी मोठी आहे. तामिळनाडू येथील अण्णा लोकांनी सहा महिन्यातच रक्कम दुपट्ट देण्याच्या नावाखाली मोठा

पाच हजार कोटींची फसवणूक
नागपूर : गेल्या चार ते पाच वर्षांत नागपुरातील हजारो लोकांच्या ठेवी हडप करणाऱ्या ठगबाजांची यादी मोठी आहे. तामिळनाडू येथील अण्णा लोकांनी सहा महिन्यातच रक्कम दुपट्ट देण्याच्या नावाखाली मोठा ताजबाग आणि नंदनवन येथे जवळपास ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्यानंतर व्यवसायाने सीए असलेल्या प्रमोद अग्रवालने महादेव लॅण्ड डेव्हलपर्स कंपनी सुरू करून लोकांना दोन वर्षांत दामदुपटीचे आमिष दाखवून जवळपास १० हजार लोकांना ८०० कोटींनी गंडा घातला होता. त्यानंतर जयंत व वर्षा झामरे (बंटी-बबली) या दाम्पत्याने दोन वर्षांत दामदुप्पट आणि आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधींनी फसवणूक केली. कुणालाही रक्कम परत मिळालेली नाही. सध्या तो लोकांना रक्कम परत देण्याचे सोंग करीत आहे. दोन वर्षांआधी रत्न आणि खड्याचा व्यापारी असल्याचे सांगून महाल भागातील हरिभाऊ मंचलवारने २०११ मध्ये दामदुपटीचे आमिष दाखवून हजार लोकांना १०० कोटींनी गंडा घातला. त्या वकील, डॉक्टर्स, प्राध्यापक, बँकांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांनी रक्कम गुंतविल्याची माहिती आहे. तो अजूनही फरार आहे. गेल्यावर्षी ठगबाज समीर जोशीच्या श्रीसूर्या कंपनीचा आर्थिक घोटाळा गाजला. समीर व पल्लवी जोशी दाम्पत्याने दोन वर्षांत दुपटीचे आमिष दाखवून जवळपास तीन हजार लोकांची ५०० कोटी रुपयांनी फसवणूक केली. सध्या समीर जोशी कारागृहात आहे. रविराज फायनान्सचा राजेश जोशी हासुद्धा फरार आहे. तक्रारीनंतर तो पोलिसांना सापडत नाही, हे एक गूढच आहे. आता प्रशांत वासनकरने हजारो लोकांची झोप उडविली आहे. वासनकरने वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गेल्या २५ वर्षांत पाच हजार लोकांना १५०० कोटी रुपयांनी फसविल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
दामदुपटीच्या योजना सारख्याच
सर्व कंपन्यांची दामदुप्पट आणि व्याजदराच्या योजना सारख्याच आहेत. या बोगस कंपन्यांमध्ये आपण कोणत्या कायद्याखाली आयुष्यभराची पुंजी गुंतवीत आहोत, याची इत्थंभूत माहिती गुंतवणूकदार जोपर्यंत करून घेणार नाहीत, तोपर्यंत अग्रवाल, झामरे, मंचलवार, समीर जोशी, वासनकर, राजेश जोशी यासारखे अनेक जण बोगस कंपन्या उघडून खोटी माहिती देऊन लोकांना लुबाडत राहतील. त्यामुळे लोकांना गुंतवणुकीसंदर्भात जागरूक होण्याची गरज आहे. उद्योजकांनाही १२ टक्के व्याजदर परवडणारा नाही, मग या बोगस कंपन्या ५० टक्के व्याजदर देतात तरी कशा? फसविल्या गेलेल्यांमध्ये बहुतांश उच्चशिक्षित आहेत.
संस्थानी मदतीसाठी पुढे यावे
कोट्यवधींचा व्यवसाय करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांचे नेटवर्क संपूर्ण देशात असतानासुद्धा एवढा मोठा व्याजदर ग्राहकांना देणे त्यांना शक्य नसते. खासगी कंपन्या अथवा संस्था एवढे व्याज का देतात, हा एक गूढ आणि संशोधनाचा विषय आहे. या कंपन्यांमध्ये आपली फसवणूक होणार असल्याची जाणीव ग्राहकांना असते. त्यानंतरही ते आयुष्याची पुंजी या कंपन्यांमध्ये गुंतवितात. फसव्या कंपन्यांची माहिती शासकीय यंत्रणा, पोलीस आणि राजकीय नेत्यांना असते. त्यानंतरही त्यांच्याकडून साधण्यात येणारी चुप्पी अशा कंपन्यांना अप्रत्यक्षरीत्या मदत करणारी असते. सर्वकाही लुटल्यानंतरही अशा फसव्या कंपन्यांच्या विरोधात कुणी तक्रार करायला पुढे येत नाही, ही शोकांतिका आहे. ग्राहक पंचायत यासंदर्भात वारंवार मार्गदर्शन आणि प्रबोधन करते. पोलीस आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडतात. अशा प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद फारच कमी असल्याने फसव्या कंपन्यांचे फावते. कठोर शिक्षेची तरतूद शासनाने करावी.
गजानन पांडे, विदर्भ अध्यक्ष, अ.भा. ग्राहक पंचायत.
कमी जोखीमेचे पर्याय उत्तम
सततच्या आर्थिक घोटाळ्यातून जनतेने संदेश घ्यावा. कमी जोखिमेच्या पर्यायांमध्ये गुंंतवणूक करावी. किमान ९ टक्के आणि जास्तीतजास्त १८ टक्के व्याजदर हा जनतेला मिळू शकतो. त्यावरील व्याजदर ही जोखीम समजावी आणि आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. आयुष्याची कमाई एका झटक्यात घोटाळेबाजांच्या हाती सोपविणे चुकीचे आहे. फसव्या कंपन्यांची लोकांना आकर्षित करण्याची पद्धतही निराळी असतो. एक किंवा दोन वर्षे काहीच लोकांना व्याज आणि मुद्दल मिळते. या बळावर ते हजारो लोकांपासून ठेवी घेण्यास मोकळे असतात. जे गुंतवितो, तो आयुष्याची पुंजी गमावतो. हे आतापर्यंतच्या आर्थिक घोटाळ्यातून पुढे आले आहे. त्यानंतरही लोक गुंतवणूक करतात, हे त्यांचे अज्ञान आहे. लोकांना मदत करण्याची राजकीय नेत्यांची जबाबदारी तेवढीच असते. पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर दबाव आणून त्यांनी लोकांना न्याय मिळवून द्यावा. फसव्या कंपन्यांपासून सजग राहावे, हे तेवढेच खरे.
सीए जुल्फेश शाह, उपाध्यक्ष, पश्चिम विभागीय सीए संस्था.
उपराजधानीत ५०० वर संस्थांचे जाळे
ठगबाज प्रमोद अग्रवाल, हरिभाऊ मंचलवार, वर्षा आणि जयंत झामरे, समीर आणि पल्लवी जोशी, राजेश आणि राधा जोशी तसेच प्रशांत वासनकर आणि कंपनी यांनी नागपूर तसेच नागपूर बाहेरच्या हजारो ठेवीदारांना कोट्यवधींचा चुना लावला. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे आर्थिक फसवणूक करणारी ही मंडळी उजेडात आली. मात्र, आजही नागपुरात छोट्यामोठ्या ५०० वर कंपन्या आणि त्यांचे संचालक, दलाल बिनबोभाट नागरिकांकडून करोडोंची रक्कम गोळा करीत आहेत. या सर्वांच्या योजनांचे नाव वेगवेगळे आणि मुदतही वेगवेगळी असली तरी उद्देश एकच आहे, तो म्हणजे, नागरिकांच्या हक्काची रक्कम गिळंकृत करायची. वित्तीय संस्था सुरू करण्यासाठी आरबीआयची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्याच्या काही अटी आहेत. लोकांची रक्कम हडपण्याचा एकमेव उद्देश समोर ठेवणारी मंडळी कोणत्याही अटी-नियमांचे पालन न करता किंवा आवश्यक ती परवानगी न मिळवता वेगवेगळ्या नावाने वित्तीय संस्था सुरू करतात. १५ ते ३० टक्क्यांपर्यंत त्यांना कमिशन देऊन त्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कंपनीशी जोडतात अन् आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांची रक्कम गिळंकृत करतात. पोलिसांना अशा संस्थांविरुद्ध जोपर्यंत तक्रारी येत नाही तोपर्यंत कारवाई करता येत नाही. त्यामुळे या संस्थाचालकांचे चांगलेच फावते. नागपुरात आजघडीला अशा ५०० वर बोगस कंपन्या नागरिकांकडून रक्कम गोळा करीत आहेत. आपली रक्कम वाचविण्यासाठी स्वत: गुंतवणूकदारांनीच अशा कंपन्या किंवा त्यांच्या गोडबोल्या दलालांपासून सावध राहाण्याची गरज आहे.