महाराष्ट्रातून पाचच रणरागिणी लोकसभेवर

By Admin | Updated: May 24, 2014 03:27 IST2014-05-24T03:27:22+5:302014-05-24T03:27:22+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातून निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवारांपैकी केवळ पाच महिला या निवडणुकीत लोकसभेवर गेल्या आहेत

Five Ranaragini Lok Sabha candidates from Maharashtra | महाराष्ट्रातून पाचच रणरागिणी लोकसभेवर

महाराष्ट्रातून पाचच रणरागिणी लोकसभेवर

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातून निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवारांपैकी केवळ पाच महिला या निवडणुकीत लोकसभेवर गेल्या आहेत. राज्यभरातून निवडणूक लढविणार्‍या तब्बल ८९७ उमेदवारांमध्ये केवळ ५८ महिला उमेदवारांचा समावेश होता. मात्र गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी वाढ झाली आहे. २००९च्या लोकसभेत केवळ ३ महिलांनी संसदेत प्रवेश मिळविला होता. या वेळी हा आकडा ५ झाला आहे. यामध्ये भाजपाच्या पूनम महाजन, हीना गावित, रक्षा खडसे, शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्टÑवादीच्या सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाचही महिला या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. पूनम महाजन या दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे या राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. हीना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे महाराष्टÑाचे माजी मंत्री आहेत. हीना गावित यांनी नऊ वेळा खासदार असलेले काँग्रेसचे माणिकराव गावित यांचा पराभव केला. रक्षा खडसे या विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत; तर भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव हे माजी खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन महिलांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यात सुप्रिया सुळे (४४) या विजयी झाल्या; पण त्यादेखील २००९च्या तुलनेत कमी फरकाने विजयी झाल्या. लोकसभा तसेच सर्व राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण सुचविणारे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत प्रलंबित आहे. हे विधेयक राज्यसभेत ९ मार्च २०१०लाच संमत झाले आहे.

Web Title: Five Ranaragini Lok Sabha candidates from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.