‘पाच पसार आरोपींना पकडा, सुटी मिळवा’
By Admin | Updated: March 4, 2017 05:23 IST2017-03-04T05:23:38+5:302017-03-04T05:23:38+5:30
पालिका निवडणुकीच्या महिनाभर सुरू असलेल्या रणधुमाळीमुळे पोलिसांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी ताटकळत राहावे लागले.

‘पाच पसार आरोपींना पकडा, सुटी मिळवा’
मनीषा म्हात्रे,
मुंबई- पालिका निवडणुकीच्या महिनाभर सुरू असलेल्या रणधुमाळीमुळे पोलिसांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी ताटकळत राहावे लागले. अशात बंदोबस्तानंतर थोडीशी उसंत मिळावी म्हणून सुटीची मागणी करणाऱ्या पोलिसांना ‘आधी पाच आरोपी पकडा, नंतर सुटी मिळवा’ अशा पोलीस उपायुक्तांच्या अजब फर्मानामुळे मुंबई पोलीस वैतागले आहेत.
जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली. त्यात सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने आरोप-प्रत्यारोप वाढले. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी पोलिसांची सुटीही रद्द करण्यात आली होती. त्यात मुंबई पोलिसांनी तब्बल ३००० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मुंबईतील लढत प्रतिष्ठेची असल्याने येथील निवडणुकीवर सर्वांच्याच नजरा लागलेल्या. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र. त्यात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आणि सपाचे पाचही पक्षांचे बळ जास्त असल्याने येथील सुरक्षेच्या जबाबदारीमुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून बसावे लागत होते. त्यामुळे ८ तासांच्या ड्युटीऐवजी चक्क या वेळी पोलिसांना २४ तास कार्यरत राहावे लागले.
स्थानिक पातळीवर वरिष्ठ निरीक्षकावर येथील जबाबदारीचा भार सर्वाधिक होता. अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले. त्यांच्या चोख नियोजनामुळे बंदोबस्त सुरळीत पार पडला. मुळात पोलीस ठाण्यातील खालच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षकांच्या आदेशाने सुटीची परवानगी मिळते, तर वरिष्ठ निरीक्षकांना सुटीसाठी पोलीस उपायुक्तांची परवानगी बंधनकारक असते. अशात बंदोबस्ताच्या ताणातून थोडी उसंत मिळावी म्हणून पोलिसांनी सुटीची मागणी केली. मात्र ‘आधी पाच पसार आरोपींना पकडा, त्यानंतर सुटी मागा,’ असे अजब फर्मान मुंबईच्या एका पोलीस उपायुक्ताने काढले आहे. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकांच्या ताणात भर पडली आहे. आरोपींना पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षकांनी खालच्या अधिकाऱ्यांच्या सुट्यांवर गदा आणल्याने येथील पोलीस वैतागले आहेत.
>बळजबरीचा ताण अंगाशी येतो
या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षकाने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, मुळात बंदोबस्तात चांगले काम केले म्हणून कौतुकाची थाप देण्याऐवजी सुटीवर गदा आणणे चुकीचे आहे. बंदोबस्तादरम्यान कुटुंबाला वेळ देणे शक्य झाले नाही त्यामुळे सुटी घेऊन त्यांच्यासोबत बाहेर जाण्याचे कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तर आणखीन एका वरिष्ठ निरीक्षकाच्या म्हणण्यानुसार, आधीच्याच ताणातून सुटका झाली नसताना हा बळजबरीचा ताण अंगाशी येत आहे. त्यामुळे ही एक प्रकारची छळवणूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे पोलिसांच्या ताणात भर पडत आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यात महिने उलटतात. त्यामुळे पुन्हा सुटीकडे दुर्लक्ष करत ही मंडळी आरोपींच्या शोधासाठी दिवसरात्र सापळे रचत असल्याचे काहीसे चित्र मुंबईत पाहावयास मिळते आहे.