नामदेव भोईटे खून प्रकरणातील पाच जणांना 24 तासांत अटक
By Admin | Updated: April 18, 2017 22:50 IST2017-04-18T22:50:20+5:302017-04-18T22:50:20+5:30
पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भोईटे (वय ३६) यांच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना चोवीस तासांत अटक

नामदेव भोईटे खून प्रकरणातील पाच जणांना 24 तासांत अटक
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 18 - पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भोईटे (वय ३६) यांच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना चोवीस तासांत अटक केली. भोईटे यांचा मित्र राजेंद्र भिंगे व त्याच्या चार साथीदारांनी उसने घेतलेले २० लाख परत देत नसल्याने भोईटे यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. खुनासाठी आरोपींनी वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली.
राजेंद्र लक्ष्मण भिंगे (वय ३८, रा. विमाननगर, पंढरपूर), गजेंद्र दिगंबर पवार (३३), रवींद्र हरिभाऊ गुजर (३७, सर्व रा. पंढरपूर), सचिन नारायण मोहिते (२४, रा. सोलापूर), रावसाहेब संभाजी लोखंडे (२८, रा. पंढरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोमवारी रात्री पंढरपूर रस्त्यावर खरशिंग फाट्याजवळ नामदेव भोईटे यांच्या खुनाच्या घटनेनंतर मोटारचालक प्रसाद निर्मल याने, मोटारीतून आलेल्या दोघांनी कोयत्याने हल्ला करून खून केल्याची फिर्याद दिली होती. मात्र घटनास्थळी रक्ताने माखलेले तीन कोयते पोलिसांना सापडल्याने दोघांपेक्षा अधिक लोकांनी भोईटे यांचा खून केल्याचा पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी राजेंद्र भिंगे याचा शोध सुरू केल्यानंतर त्याचे मोबाईल लोकेशन कोल्हापूर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस पथकाने कोल्हापुरात जाऊन प्रमुख संशयित राजेंद्र भिंगे आणि त्याच्या चार साथीदारांना ताब्यात घेतले. खुनासाठी वापरण्यात आलेली मोटार (एमएच १२ जी झेड २७७५) जप्त करण्यात आली.
मृत भोईटे हे राजेंद्र भिंगे याचे २० लाख रुपये परत देत नव्हते. या रागातून भिंगे याने साथीदारांसोबत भोईटे यांचा काटा काढल्याची कबुली दिली आहे. खूनप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खुनासाठी तिघांनी कोयता व एकाने मोठा चाकू वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तीन कोयत्यांसह चाकूही जप्त केला आहे.
असा झाला खून-
नामदेव भोईटे, राजू भिंगे व नाना झाडबुके सोमवारी मिरजेत भारती रुग्णालयात उपचार घेणाºया भ्ािंगे याच्या नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी भाड्याच्या मोटारीतून (क्र. एमएच-४५-ए ३५५४) आले होते. सायंकाळी सात वाजता तिघेजण पंढरपूरला परत निघाले. ते खरशिंग फाट्यावर गेले असता, भिंगे याने लघुशंकेचा बहाणा करीत तेथे मोटार थांबविली. मोटार थांबताच त्यांच्या मागून मोटारीतूनच आलेल्यांनी नामदेव भोईटे यांना मोटारीतून बाहेर ओढून काढून त्यांच्या डोक्यावर चाकू व कोयत्याने सपासप ३५ वार केले. कोयत्यांच्या वारामुळे भोईटे जागीच कोसळले. हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणारा मोटारचालक प्रसाद निर्मल यालाही हल्लेखोरांनी मारहाण केल्याने, तो जीव वाचविण्यासाठी पळून जाऊन लपून बसला. भोईटे यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर हल्लेखोर खुनासाठी वापरलेले दोन कोयते तेथेच टाकून मोटारीतून पसार झाले. मोटारचालक प्रसाद निर्मल याने मोबाईलवरून पंढरपुरात गाडी मालकास या घटनेबाबत कळविल्याने, खुनाबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक राजू मोरे, उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी भोईटे यांचा मृतदेह, लपून बसलेला चालक प्रसाद निर्मल, मोटार व खुनासाठी वापरलेले दोन नवीन कोयते ताब्यात घेतले. पळून गेलेल्या नाना झाडबुके यास पंढरपूर येथून मंगळवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले.
कवटी फुटून तीन बोटे तुटली-
कोयत्यांच्या हल्ल्यात भोईटे यांच्या डोक्याची कवटी फुटून, उजव्या हाताची तीन बोटे तुटली होती.
भोईटे समर्थकांची गर्दी-
पंढरपूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलेले नामदेव भोईटे यांच्या खुनाचे वृत्त समजताच सोमवारी रात्री मिरज शासकीय रुग्णालयात भोईटे समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. हल्लेखोरांनी खुनासाठी वापरलेले तीन कोयते पोलिसांनी जप्त केले.
मटका आणि खासगी सावकारी-
नामदेव भोईटे यांचा पंढरपुरात मटका व खासगी सावकारीचा व्यवसाय आहे. राजू भिंगे त्यांना व्यवसायात मदत करीत होता. भोईटे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने भिंगे त्यांच्यावर चिडून होता. मिरजेला येतानाही मोटारीत या दोघांत पैशाबाबत चर्चा झाली होती. पैसे देत नसल्याच्या कारणावरुन भिंगे याने कट रचून भोईटे यांचा खून केला. भोईटे यांच्यावर हल्ला होत असताना हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणारा मोटारचालक प्रसाद निर्मल यास भिंगे याने, ‘गप्प बस, नाही तर तुलाही मारीन’, अशी धमकी दिली होती. भोईटे पंढरपूरचे आ. भारत भालके यांचे कट्टर समर्थक होते.