पाच महिन्यांत ४७२ लाचखोर जाळ्यात
By Admin | Updated: June 7, 2016 20:43 IST2016-06-07T20:43:04+5:302016-06-07T20:43:04+5:30
आप्पासाहेब पाटील राज्यात लाचखोरीत अव्वल राहण्याची परंपरा महसूल व पोलीस खात्यानी कायम ठेवली आहे़ १ जानेवारी ते ३ जून या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यात ४७२ लाचखोर जाळ्यात अडकले आहेत़

पाच महिन्यांत ४७२ लाचखोर जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई :पोलीस आणि महसूल खाते आघाडीवरच
सोलापूर : आप्पासाहेब पाटील राज्यात लाचखोरीत अव्वल राहण्याची परंपरा महसूल व पोलीस खात्यानी कायम ठेवली आहे़ १ जानेवारी ते ३ जून या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यात ४७२ लाचखोर जाळ्यात अडकले आहेत़ उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमविणारे आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील सरकारी कर्मचाऱ्याचाही यात समावेश आहे़
लाचखोरांमुळे सर्वसामांन्याची होणारी पिळवणूक तसेच शासकीय-निमशासकीय कामासाठी सामांन्याची पदोपदी होणारी अडवणूक वाढत असल्याने स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी बाबुंना लाच देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा लाचखोरांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गत पाच महिन्यामध्ये केलेल्या सापळा कारवाईत ४६३ लाचखोरांना पकडले आहे. त्याचप्रमाणे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमविणारे व इतर भ्रष्टाचार प्रकरणातील ८ अशा एकूण ४७२ लाचखोरांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे १० कोटी ९० लाख ६ हजार २५३ रूपये एवढी मालमत्ता हस्तगत करण्याची कारवाई केली आहे.
विभागनिहाय लाचखोरांची संख्या
मुंबई : ३७
ठाणे : ५५
पुणे : ८३
नाशिक : ६०
नागपूर : ६१
अमरावती : ५१
औरंगाबाद : ७८
नांदेड : ४७
एकूण : ४७२़
वर्षनिहाय लाचखोरांची संख्या
२०१० : ५२८
२०११ : ५१२
२०१२ : ५१४
२०१३ : ६०४
२०१४ : १३१६
२०१५ : १२७९
२०१६ जूनअखेर : ४७२
लाचखोर खातेनिहाय
महसुल १४५, पोलीस १३८, म़रा़वि़मं २३, महानगरपालिका २७, पंचायत समिती ५९, वनविभाग २२, आरोग्य विभाग २०, शिक्षण विभाग ३६, आरटीओ ८, पाणीपुरवठा ६, बांधकाम विभाग ५, विधी व न्यायविभाग ७, समाजकल्याण विभाग ८, कृषी विभाग ७ व अन्य़
२०१६ मधील ३८१ प्रकरणे प्रलंबित
सन २०१६ या सालात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचखोरीत पकडलेल्या ४७४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ यातील ३८१ प्रकरणे प्रलंबित आहेत़ यातील १८ प्रकरणाचे दोषारोप दाखल करण्यात आले आहेत़
बदनामीनंतरही लाचखोरीत वाढ
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदनामी व्हावी व त्यातून असे प्रकार थांबावेत या उद्देशाने सोशल मिडियाचा आधार घेतला़ लाचखोरीत सापडलेल्यांचे फेसबुकवर छायाचित्र प्रसिध्द करून त्याची बदनामी करण्याच्या हेतू लाचलुचपत विभागाचा होता़ मात्र बदनामीनंतरही लाचखोरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे सोशल मिडियावर बदनामी करण्याचा फंडा फेल जातो की काय अशी आशा निर्माण झाली आहे़
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मानसिकतेमुळे लाचखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ सर्वसामान्यकडून लाच स्वीकारणाऱ्या बाबुंच्या बदनामीसाठी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे़ शिवाय तक्रारदारांसाठी विविध सेवासुविधा निर्माण करून दिल्यामुळे तक्रारदारांची संख्या वाढली आहे़ लाचखोरांवर जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कटिबध्द आहे़
-गणेश जवादवाड
उप अधिक्षक, सोलापूर एसीबी़