निर्भया व्हॉट्सअॅपमुळे पाच मुलींची सुटका
By Admin | Updated: April 8, 2015 02:38 IST2015-04-08T02:38:25+5:302015-04-08T02:38:25+5:30
रेल्वे पोलिसांतर्फे (जीआरपी) सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकामुळे मुंबईतील पाच मुलींची बंगळुरमधून सुटका करण्यात आली

निर्भया व्हॉट्सअॅपमुळे पाच मुलींची सुटका
मुंबई : रेल्वे पोलिसांतर्फे (जीआरपी) सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकामुळे मुंबईतील पाच मुलींची बंगळुरमधून सुटका करण्यात आली. काम देण्याच्या बहाण्याने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची जाणीव होताच यापैकी एका मुलीने मुंबई रेल्वे पोलिसांच्या निर्भया व्हॉट्सअॅप क्रमांकावर बंगळुरमधूनच मदतीचा मेसेज पाठविला आणि हा मेसेज बघताच पोलिसांकडून सगळी सूत्रे हलविण्यात आली. या मेसेजच्या आधारे पाच मुलींची सुटका करण्यात आल्याचे मुंबई रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड येथील रहिवासी असलेल्या एका मुलीने रेल्वे पोलिसांच्या ९८३३१२२२२ या क्रमांकावर १ एप्रिल २0१५ रोजी मेसेज पाठवून मदत मागितली. पाच मुलींच्या मोबाइलवरून हे मेसेज आले असून, ते बंगळुरूमधील असल्याचे समजले. रेल्वे पोलिसांच्या सायबर क्राइम पथकाने बंगळुरू येथील ओल्ड चामुंडी नगर येथील पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. त्या पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून मुलींची सुटका केली.