विदर्भात पाच शेतक-यांची आत्महत्या
By Admin | Updated: November 29, 2014 00:38 IST2014-11-29T00:11:17+5:302014-11-29T00:38:48+5:30
अमरावतीसह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांनी संपविली जीवनयात्रा.

विदर्भात पाच शेतक-यांची आत्महत्या
अकोला: दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच विदर्भात शेतकर्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. नापिकीला कंटाळून विदर्भात गुरुवारी व शुक्रवारी पाच शेतकर्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे एका युवा शेतकर्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू विष्णू राठोड हे मृत शेतकर्याचे नाव आहे. या जिल्ह्यात आत्महत्येची दुसरी घटना मंगरूळपीर तालुक्यातील तर्हाळा येथे घडली. या घटनेत एका कर्जबाजारी शेतकर्याच्या एकुलत्या एक मुलाने विहीरीत उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. राहूल आगळे हे त्याचे नाव असून, त्याचा १७ डिसेंबर रोजी विवाह निश्चित करण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील रामकृष्ण शत्रुघ्न गावंडे या ३६ वर्षीय शेतकर्यानेही विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, कर्ज आणि मुलांच्या आजारपणाला तो कंटाळला होता.भद्रावती तालुक्यातील विजासन येथील शेतकर्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. सुरेश लटारी घुगुल (४२) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. यावर्षी झालेली नापिकी आणि कर्जाचा डोंगर सतत वाढत असल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथील विनोद गोविंद माळीक (३५) या शेतकर्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे चार एकर शेती असुन त्यांच्यावर ८0 हजार रुपयांचे बँकेचे कर्ज आणि ५0 हजार रुपये खासगी कर्ज होते.