पाच धरणे पडली कोरडी

By Admin | Updated: May 30, 2016 02:22 IST2016-05-30T02:22:22+5:302016-05-30T02:22:22+5:30

मान्सून लांबल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाला उशिरा सुरुवात होणार आहे.

Five dams fall dry | पाच धरणे पडली कोरडी

पाच धरणे पडली कोरडी


अलिबाग : मान्सून लांबल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाला उशिरा सुरुवात होणार आहे. लांबलेला पाऊस आणि कडक उन्हामुळे जिल्ह्यातील २८ धरणांपैकी रानीवली, वरंध, खिंडवाडी, कोर्थुडे आणि खेरे ही पाच धरणे कोरडी पडली आहेत. एकत्रित धरणांमध्ये फक्त १८.५६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा तीव्र बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली.
रायगड जिल्ह्यात उष्णता वाढल्याने ३८ अंशापर्यंत तापमान नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यातील अस्तित्वात असणाऱ्या २८ लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा प्रचंड उष्णतेमुळे आटत चालले आहे. त्यामुळे त्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनांवर विपरीत परिणाम होत आहे. सदरील धरणांमध्ये फक्त १८.५६१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे विभागांतर्गत २८ धरणांचा समावेश येतो. या सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता ही ७१.५७५ दशलक्ष घनमीटर आहे. ६८.२८६ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. परंतु आता धरणांनी तळ गाठायला सुरुवात केल्याने पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे.
पाऊस वेळेवर पडल्यास पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ शकते, परंतु वातावरणातील वाढते तापमान आणि लांबलेल्या मान्सूनमुळे सध्या तरी तशी शक्यता दिसून येत नाही. अशीच परिस्थिती अजून काही दिवस राहिल्यास नागरिकांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचा सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई आराखडाही कुचकामी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याची समस्या जाणवणार असल्यानेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात दिल्या होत्या. (प्रतिनिधी)
>धरणातील शिल्लक पाणीसाठा
रानीवली धरणाची साठवण क्षमता ही २.२२४ दलघमी आहे. सध्या तेथे ० टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे वरंध धरणाची साठवण क्षमता २.०८४ दलघमी सध्या ० टक्के, खिंडवाडी २.१३६ / ० टक्के, कोर्थुडे २.४९३ / ०, खेरे १.६५८ /० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित २३ धरणांत१८.५६१ पाणीसाठा आहे. पाऊस लवकर आला नाही, तर तोही आटण्याची शक्यता आहे.

Web Title: Five dams fall dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.