बोरिवलीत दिवसाढवळया पाच कोटींचा दरोडा

By Admin | Updated: May 10, 2014 20:56 IST2014-05-10T20:22:35+5:302014-05-10T20:56:43+5:30

सुरतहून मुंबईला आलेले तब्बल पाच कोटींहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे पाच जणांच्या सशस्त्र टोळीने लुटले.

Five crore robbery in Borivli | बोरिवलीत दिवसाढवळया पाच कोटींचा दरोडा

बोरिवलीत दिवसाढवळया पाच कोटींचा दरोडा

मुंबई- सुरतहून मुंबईला आलेले तब्बल पाच कोटींहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे पाच जणांच्या सशस्त्र टोळीने लुटले. हा दरोडा काल दुपारी साडेतीनच्या सुमारास बोरिवलीच्या नॅशनल पार्कजवळ पडला. हा ऐवज सुरक्षितपणे वाहून नेणार्‍या गाडीचे दरोडेखोरांनी अपहरण केले. ती विरारमध्ये बेवारस अवस्थेत सोडली. गाडीतील सुरक्षारक्षक हात-पाय, तोंड बांधलेल्या अवस्थेत आढळले.
दुपारी साडेतीन ते रात्री नऊ पर्यंत हा थरार बोरिवली ते विरारदरम्यान घडला. हा ऐवज ज्या कंपनीचा होता त्या कंपनीचा वाहनचालक उदयभान सिंग(४२) हा या दरोडयाचा मास्टर माईंड असावा, असा संशय पोलिसांना आहे.
बोरिवलीचे कस्तुरबा मार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्या माहितीनुसार वांद्रे-कुर्ला संकुलात कार्यालय असलेल्या मलका अमित जे. के. लॉजीस्टीक या कंपनीचा हा ऐवज होता. कंपनीने सुमारे तीनेक किलो सोन्याचे दागिने आणि आठशे ग्रॅम हिरे पॉलिशींगसाठी सुरत येथे धाडले होते. ते गुजरात एक्स्प्रेसने परत आले. हा ऐवज सुरक्षितपणे कंपनी कार्यालयात आणण्यासाठी एस. आर. सिक्युरीटी या कंपनीला कंत्राट दिले होते. त्यानुसार जे. के. लॉजीस्टीक कंपनीची बोलेरो गाडी सिक्युरीटी गार्डना घेऊन बोरिवली स्थानकात गेली. तेथून हे दागिने वांद्रे-कुर्ला संकुलात आणण्यासाठी माघारी फिरली. तेव्हा दुपारी साडेतीनच्या सुमारास बोलेरोचा चालक उदयभान याने टायर पंˆर झाल्याचा संशय व्यक्त करत ती नॅशनलपार्क समोरील रस्त्याकडेला उभी केली. उदयभान गाडीबाहेर पडला. अवघ्या दोन सेकंदात पाच सशस्त्र तरूण या बोलेरो गाडीत शिरले.
दागिन्यांची ने-आण करण्याकरता बोलेरोला सिक्युरीटी रूम होता. त्यात दागिने होतेच. त्यासोबत एसआर कंपनीचे दोन सिक्युरीटी गार्ड, सुपरवायझर आणि अन्य दोन कामगार होते. या सिक्युरीटी रूममध्ये दरोडेखोर सहज शिरले. तेव्हा चालक उदयभानने प्रथम सिक्युरीटी गार्डचे हातपाय बांधण्याचे आदेश दिले. त्यानुसार दरोडेखोरंानी पाचही जणांचे हात-पाय, तोंड बांधले. चालक उदयभानने गाडी विरारमधील वजे्रश्वरी रोड येथे नेली. तेथे उदयभानसह पाचही दरोडेखोर दागिने, हिर्‍यांचा ऐवज घेऊन पसार झाले.
पुढे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गाडीत बांधून पडलेल्या पाचजणांनी सुटकेसाठी आदळआपट केली. ती ऐकून वजे्रश्वरी रोडवरील पादचारी, वाहनचालक बोलेरेजवळ जमा झाले. त्यांनी विरार पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी गाडी उघडली तेव्हा आत बांधून पडलेले पाचजण आढळले. त्यांची सुटका करून, त्यांचा जबाब नोंदवून हा गुन्हा तपासासाठी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला, अशी माहिती कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक भरत वरळीकर यांनी दिली.गुन्हा घडून एक दिवस लोटला तरी जेके लॉजीस्टीक कंपनीचे मालक पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी पोहोचलेले नाहीत, असेही समजते.
दरम्यान, अपहरण, मारहाण, दरोडा या कलमान्वये गुन्हा नोंदवून कस्तुरबा मार्ग पोलीस उदयभान आणि त्याच्या पाच साथीदारांचा शोध घेत आहेत. भर दिवसा घडलेल्या या दरोडयामुळे मुंबई गुन्हे शाखाही या गुन्हयाचा तपास करते आहे.


चालक उदयभानला गुन्हेगारी पार्श्वभुमी
चालक उदयभान सिंग अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना मिळाली आहे. २००२ साली बोरिवलीच्या पुर्वेकडे गोळीबार करून एका व्यापार्‍याचे ६८ लाखांचे हिरे लुटण्यात आले होते. हल्ल्यात व्यापार्‍याचा मृत्यू झाला होता. या गुन्हयात उदयभान सहभागी होता. त्यासाठी त्याने सजाही भोगलेली आहे. तो मुळचा युपीचा असून सध्या नालासोपारा येथे वास्तव्यास होता. त्याच्या या पार्श्वभुमीबाबत जे के लॉजीस्टीक कंपनीला माहिती होती का, याचाही तपास कस्तुरबा मार्ग पोलीस करणार आहेत.

Web Title: Five crore robbery in Borivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.