पाच आरोपींना सश्रम कारावास
By Admin | Updated: May 7, 2015 03:16 IST2015-05-07T03:16:58+5:302015-05-07T03:16:58+5:30
हत्या प्रकरणातून सत्र न्यायालयात निर्दोष सुटलेल्या पाच आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या कलमांतर्गत दोषी ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

पाच आरोपींना सश्रम कारावास
नागपूर : हत्या प्रकरणातून सत्र न्यायालयात निर्दोष सुटलेल्या पाच आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या कलमांतर्गत दोषी ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
योगेश भोयर (३०), सपना बावरिया (३७), विजय ऊर्फ सलोनी चापरे (२४), अमन ऊर्फ सोनू मेंढे (२३) व अजय सुनील बावणे (२४), अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत़ उच्च न्यायालयाने भादंविच्या कलम ३०४-२ अंतर्गत योगेशला पाच वर्षे , इतर आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्या़ अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली़
मृताचे नाव राकेशकुमार होते. या घटनेचे चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. सत्र न्यायालयाने ओळख परेडवर संशय व्यक्त करून आरोपींना निर्दोष सोडले होते. या निर्णयाविरुद्ध शासनाने उच्च न्यायालयात अपील केले होते. २६ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सरकारी वकील तहसीन मिर्झा यांनी प्रकरणातील महत्त्वपूर्ण बाबी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सत्र न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला होता. यानंतर न्यायालयाने शासनाचे अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून आरोपींविरुद्ध अटक वॉरंट बजावला होता. (प्रतिनिधी)
अशी घडली घटना
तृतीयपंथीयांच्या वेशात रेल्वे प्रवाशांकडून बळजबरीने पैसे उकळणे हा आरोपींचा व्यवसाय आहे. २८ जून २०११ रोजी संघमित्रा एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकारवर थांबल्यानंतर आरोपी तृतीयपंथीयांच्या वेशात प्रवाशांना पैसे मागायला लागले. या गाडीत राकेशकुमार व त्याचे मित्र बसले होते. दरम्यान, राकेशकुमार व आरोपींमध्ये भांडण झाले. आरोपी योगेशने राकेशकुमारच्या मांडीत चाकू भोसकला तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे राकेशकुमारचा मृत्यू झाला होता.