विसर्जन मिरवणुकीत पोलिसांमध्येच फ्रिस्टाईल, आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: September 30, 2015 23:52 IST2015-09-30T23:52:23+5:302015-09-30T23:52:23+5:30
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील प्रकार.

विसर्जन मिरवणुकीत पोलिसांमध्येच फ्रिस्टाईल, आत्महत्येचा प्रयत्न
कारंजा (वाशिम): गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीसांमध्ये तुफान हाणामारी झाली. यानंतर एका पोलिसाने दुकानात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ३0 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास स्थानिक बायपास परिसरात घडली. कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास काढण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक सुरू असताना, बायपास परिसरात पोलिसांमध्ये वाद झाला. वाद वाढून भररस्त्यावर पोलिसांमध्ये हाणामारी सुरू झाली. पोलिसांमध्येच सुरू असलेली फ्रिस्टाईल पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. वाद मिटल्यानंतर कॉन्स्टेबल गजानन नवनाथ मुखाडे (वय २८) यांनी बायपास परिसरातील एका दुकानातून विषारी द्रव्य विकत घेवून ते तिथेच प्राशन केले. सहकारी पोलिसांनी त्यांना तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर कॉन्स्टेबल मुखाडे यांना अकोला सवरेपचार रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेच्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. वृत्त लिहेपर्यंत याप्रकरणी पोलिसात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती. याप्रकरणी प्रशासकीय चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाईदेखील केली जाईल, असे कारंजा येथील उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवल यांनी सांगीतले.