मासेमारी नौका तीन खलाशांसह बेपत्ता
By Admin | Updated: October 28, 2014 00:20 IST2014-10-28T00:10:38+5:302014-10-28T00:20:38+5:30
सर्जेकोट येथील घटना : सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा; नुकसानीचा आकडा दहा लाखांवर

मासेमारी नौका तीन खलाशांसह बेपत्ता
मालवण/सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने सरासरी तीन हजार मिलिमीटरचा पल्ला पार केला असून, गेले चार दिवस सुरू असलेला पाऊस आणखी तीन दिवस २९ आॅक्टोबरपर्यंत मुसळधार पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. खराब हवामानामुळे सर्जेकोट येथील मासेमारी नौका तीन खलाशांसह बेपत्ता झाल्याची घटना मालवण बंदरात घडली आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा दहा लाखांवर पोहोचला आहे.
सिंधुुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने आजच्या चौथ्या दिवशीही संततधार सुरूच ठेवली आहे. समुद्रातील खराब हवामानामुळे मालवण सर्जेकोट येथील नौका समुद्रात भरकटलेली आहे. समुद्र खवळण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी संभाजी विनायक पराडकर यांची ‘गोकर्ण’ ही नौका दुपारी अडीचच्या सुमारास सर्जेकोट येथून समुद्रात मासेमारीस निघाली होती. या बोटीवर कर्नाटक कारवार येथील दशरथ शंभा पेडणेकर, दिनकर मधू जोशी व सुभाष राधाकृष्ण कुर्ले असे तीन खलाशी होते. शुक्रवारपासून अद्याप समुद्र खवळलेला असून, या नौकेतील तीनही खलाशांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. खलाशी व बोट परत न आल्यामुळे नौकामालक संभाजी पराडकर यांनी मालवण पोलिसांत माहिती नोंदविली आहे. मालवण पोलिसांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोस्टल पोलिसांना संदेश पाठविला आहे.
गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. भातकापणीला जोर चढला असतानाच शुक्रवारपासून पावसाने सुरुवात केली. त्यामुळे कापणी करून वाळत टाकलेले भात काही ठिकाणी पावसामुळे वाहून गेले, तर काही ठिकाणी वाफ्यामध्ये पाणी साचल्याने तरंगू लागले आहे. चार दिवस पावसाची संततधार सुरू राहिल्याने जमिनीवर आडवे झालेले भात कुजण्याची भीती व्यक्त होत आहे. (पान १०वर)
जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी पद रिक्त
सिंधुदुुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे पद एक वर्षापासून रिक्त आहे. याबाबतचे प्रभारी पद आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक एन. जी. वाकडे यांच्याकडे असून, त्यांच्याकडे दोन्ही पदभार असल्याने कृषी विकासावर दुर्लक्ष होत आहे. कृषी खात्याचे वरिष्ठ अधिकारी नसल्याने परतीच्या पावसाने भात पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबतची अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, नुकसानीचा आकडा सुमारे दहा लाखांवर गेला आहे.
बंदरात दोन नंबरचा बावटा
निलोफर वादळाच्या शक्यतेमुळे तसेच समुद्रातील खराब हवामानामुळे मालवण बंदर विभागाकडून येथील बंदरात दोन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. तसेच मासेमारी नौका, पर्यटन व्यावसायिक यांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत.
पर्यटकांचा हिरमोड
दिवाळीची सलग सुटी आल्यामुळे पर्यटकांनी मालवणकडे धाव घेतली आहे, परंतु खराब समुद्री हवामानामुळे बोटिंग, स्नॉर्कलिंग तसेच किल्लाप्रवासी होडी वाहतूक आज दुपारपासून बंद केली आहे. सागरी पर्यटन व किल्ला प्रवाशी होडी वाहतूक बंदमुळे मालवणात आलेल्या अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला.
प्रशासन आदेशाच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात सुरूअसलेल्या पावसामुळे भातशेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी जिल्हा प्रशासन नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी शासन आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या कृषी अधीक्षक कार्यालयाकडून शासनास अहवाल सादरासाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरूकेले आहे; मात्र शासनाकडून अद्यापही नुकसानीचे पंचनाम्याबाबत आदेश प्राप्त झालेले नाहीत.
हवामान खात्याने २९ आॅक्टोबरपर्यंत आणखी तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे, तर मच्छिमारांना खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवर दोन नंबरचे बावटे लावण्याचा इशाराही देण्यात आला.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११.४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत एकूण सरासरी ३०३३.३० मिलिमीटर पाऊस पडला आहे. यावर्षी पावसाने आतापर्यंत सरासरी तीन हजार मिलिमीटर टप्पा पार केला आहे, तर आणखी तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. भातशेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर आणखी काही दिवस पाऊस पडल्यास ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
गेल्या २४ तासांत पडलेला तालुकानिहाय पाऊस - दोडामार्ग - १७ (३७१४), सावंतवाडी - ९ (३६१२), वेंगुर्ला - १०.२० (२६२७.३५), कुडाळ - ८ (२८२८.५९), मालवण - १४ (२९०८.४०), कणकवली - १४ (३२१४.३८), देवगड - १४ (२३६२.७०), वैभववाडी - ५ (२९९९) असा पाऊस पडल्याची नोंद झाली.