मच्छीमार करणार समुद्रात आंदोलन
By Admin | Updated: January 14, 2015 04:47 IST2015-01-14T04:47:18+5:302015-01-14T04:47:18+5:30
मासेमारीच्या मोसमात ओएनजीसीद्वारे (आॅइल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) होणा-या तेल सर्वेक्षणामुळे मच्छिमारांना समुद्रात येण्यास मज्जाव करण्यात येत आहे

मच्छीमार करणार समुद्रात आंदोलन
राजू काळे, भार्इंदर
मासेमारीच्या मोसमात ओएनजीसीद्वारे (आॅइल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) होणा-या तेल सर्वेक्षणामुळे मच्छिमारांना समुद्रात येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे सरकार व कंपनीच्या निषेधार्थ कुलाबा ते सातपाटीचे (पालघर) मच्छीमार येत्या शुक्रवारी भरसमुद्रात सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने करणार आहेत.
पश्चिम किनारपट्टीवरील वसई ते अर्नाळा समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ५० नॉटीकल मैल अंतरावर ओएनजीसी तेल कंपनीमार्फत १५ जानेवारीपासून तेलसर्वेक्षण सुरू होणार आहे. ते महिनाभर चालण्याची शक्यता आहे. ते साधारणत: ८ ते १० चौरस नॉटीकल मैल क्षेत्रातच होण्याची शक्यता असली तरी सर्व्हेक्षणादरम्यान मच्छीमारांना समुद्रात ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ऐन मासेमारी मोसमात मच्छीमारांच्या व्यवसायावर यामुळे संक्रांत येणार आहे.
तेल सर्वेक्षण १५ मे नंतर मासेमारी बंदीच्या कालावधीत करण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने येत्या दोन दिवसांतही त्यावर निर्णय न झाल्यास १६ जानेवारीला कुलाबा ते सातपाटी किनारपट्टीवरील सर्व मच्छीमार सुमारे ३० ते ३५ नॉटीकल मैल खोल समुद्रात मोर्चा काढणार आहेत. तसेच बोटीवर काळे झेंडे लावून ओएनजीसी व शासनाच्या या धोरणांचा निषेध करणार आहेत. यावेळी समुद्रातील १९-२५ व ७२-१२ (जीपीएस पोझिशन सिस्टीम) या ठिकाणी मच्छीमार बोटी एकत्र जमतील, असे निर्देश संबंधित मच्छीमार संस्थांनी सदस्यांना दिले आहेत.