‘एक मच्छिमार, एक मासा’
By Admin | Updated: October 24, 2015 00:39 IST2015-10-23T21:43:29+5:302015-10-24T00:39:31+5:30
अभिनव उपक्रम : निधीचे होणार संकलन, पहिल्याच दिवशी तीन हजाराचा निधी

‘एक मच्छिमार, एक मासा’
मालवण : पर्ससीन नेट आणि परराज्यातील हायस्पीड मासेमारीचे अतिक्रमण, पर्ससीन विरोधी न्यायालीन लढा, आंदोलने असा संघर्ष करत जणू अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छिमारांनी ‘एक मच्छिमार एक मासा’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. मच्छिमारांच्या जाळीत सापडलेल्या मासळी पैकी एक मासा बाजूला काढत जमा झालेल्या मासळीची घाऊक विक्री करून निधी उभारला जाणार आहे. जमा झालेला निधी पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्यासाठी तसेच मच्छिमार समाजातील सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरात येणार आहे.
मच्छिमार नेते तथा नॅशनल फिश वर्कर फोरमचे सदस्य रविकिरण तोरस्कर म्हणाले, गेली अनेक वर्ष विचाराधीन असलेली ही संकल्पना दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रत्यक्षात उतरली आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर रापण, गिलनेट, न्हय, ट्रोलिंग आदी प्रकारची मासेमारी गेली अनेक वर्ष सुरु असून ३० ते ३५ हजार कुटुंबे यावर आपली उपजीविका करत आहेत. शासनानेही प्रत्येक प्रकारच्या मासेमारीसाठी समुद्री क्षेत्र ठरवून दिले आहे. असे असताना गेली काही वर्ष अनधिकृत यांत्रिक पर्ससिन, हायस्पीड या सारख्या परराज्यातील औद्योगिक नौकांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासळीची लयलूट सुरु केली आहे. यात मत्स्यविभाग व मत्स्यखाते कमी पडत आहे. तर मच्छिमारांचा सविनय लढाही कमी पडतो आहे. यात न्यायासाठी संघर्ष लढा देणारा पारंपरिक मच्छिमार आर्थिक बाजूने कमी पडत आहे. त्यामुळे ‘एक मच्छिमार एक मासा’ ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. मच्छिमार, महिला, व्यापारी व एजंट आदींनी यास सहमती दिली आहे. दरदिवशी हा उपक्रम सुरु राहणार असून यात कोणत्याही स्वरूपाचे बंधन असणार नाही असेही सांगण्यात आले. देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर अश्या प्रकारची संकल्पना राबवली जात आहे. सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातून या संकल्पनेस आज सुरवात झाली. मालवण मासळी मार्केटजवळ मासे लिलावाच्या ठिकाणी आज पहिल्याच दिवशी जमा झालेल्या मासळीच्या लिलावातून २ हजार ८०० रुपये निधी गोळा झाले. यावेळी जेष्ठ मच्छिमार नेते रमेश धुरी, विकी तोरस्कर, दिलीप घारे, रुपेश प्रभू, मिथुन मालंडकर, वीरेश लोणे, अना लोने, भाऊ मोर्जे, सन्मेश परब आदी मच्छिमार उपस्थित
होते. (प्रतिनिधी)