मत्स्य महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार?
By Admin | Updated: September 9, 2014 04:42 IST2014-09-09T04:42:26+5:302014-09-09T04:42:26+5:30
सहकार चळवळीत मत्स्य व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकासात वरदान ठरणारे मत्स्य विकास महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार आहे.

मत्स्य महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार?
मोहन राऊत, अमरावती-
सहकार चळवळीत मत्स्य व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकासात वरदान ठरणारे मत्स्य विकास महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार आहे. विदर्भाच्या वाट्याला आलेले हे पद न भरल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्यात मत्स्य विकास महामंडळ १५ वर्षांपूर्वी निर्माण झाले. अनेक वर्षांपासून अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उपाध्यक्षपद सहा महिन्यांपूर्वीच जाहीर करून कोकणातील सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पुष्पसेन सावंत यांच्याकडे सोपविले आहे. आतापर्यंत विदर्भातील गोड्या पाण्याच्या पट्टय़ाला अध्यक्षपदाचा मान मिळत होता. गेली दहा वर्षे नागपूर येथील बर्वे यांनी हे पद सांभाळले. एक वर्षापासून अध्यक्षपदाचा कार्यभार मत्स्यविकासमंत्री मधुकर चव्हाण सांभाळत आहेत. विदर्भातील भोई समाजातील नेत्यांना अध्यक्षपद द्यावे म्हणून नागपूर, अमरावती, अकोला येथील अनेक नेत्यांनी त्यावेळी प्रयत्न केले. परंतु हे पद भरले नाही.
अमरावती विभागात मत्स्य व्यवसाय करणार्या ६८, यवतमाळ जिल्ह्यात १७५, अकोल्यात ३८, वाशीम जिल्ह्यात ३४, बुलडाणा जिल्ह्यात ५0 संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे. या विभागाला न्याय मिळावा, यासाठी पाचही जिल्ह्यांतील भोई समाज संघटना पुढे सरसावल्या होत्या. अमरावती विभागातील भोई समाजाचे सर्वांगीण प्रश्न सोडविणार्या अध्यक्षांची मत्स्यविकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी, अशी अपेक्षा या विभागातील ३ लाख भोई समाजाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली होती. परंतु आचारसंहिता घोषित होण्याची वेळ आली असताना विदर्भाला हे पद न दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.