मुंबईतला डेंग्यूचा पहिला बळी
By Admin | Updated: July 13, 2016 21:28 IST2016-07-13T21:28:21+5:302016-07-13T21:28:21+5:30
जून अखेरीस सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले असले तरी साथीचे आजारांचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे.

मुंबईतला डेंग्यूचा पहिला बळी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - जून अखेरीस सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले असले तरी साथीचे आजारांचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे. चेंबूर येथील १८ वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे सायन रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला. हा मुंबईतला डेंग्यूचा पहिला बळी आहे.
चेंबूर येथील १८ वर्षीय मुलाला ताप येत असल्याने महापालिकेच्या माँ रुग्णालयात ८ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात उपचार सुरु असूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे दोन दिवसांनी म्हणजे १० जुलै रोजी या मुलाला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. या मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे दोन वाजता या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
साठलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. घरात साठवलेल्या पाण्यात अधिक प्रमाणात डेंग्यूचे आणि मलेरियाचे डास आढळून येतात. त्यामुळे घरात स्वच्छता ठेवा, सात दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साठवून ठेऊ नका, असे आवाहन महापालिका करत आहेत.