देशातील पहिले तरंगते हॉटेल मुंबईत
By Admin | Updated: May 22, 2014 05:06 IST2014-05-22T05:06:27+5:302014-05-22T05:06:27+5:30
पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल पडले असून, देशातल्या पहिल्या तरंगत्या हॉटेलचा शुभारंभ करण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला आहे.
देशातील पहिले तरंगते हॉटेल मुंबईत
मुंबई : पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल पडले असून, देशातल्या पहिल्या तरंगत्या हॉटेलचा शुभारंभ करण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला आहे. मुंबईत सुरू झालेले हे तरंगते हॉटेल देशी-विदेशी पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल, असा विश्वास पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने आणि डब्ल्यू. बी. इंटरनॅशनल कन्सल्टंट्स एबी हॉस्पिटॅलिटी यांच्या सहकार्याने देशातल्या पहिल्या तरंगत्या हॉटेलचा शुभारंभ झाला. वांद्रे वरळी सी-लिंकजवळ असलेल्या मेरिटाइम बोर्डच्या जेट्टीवर करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सुमित मलिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी आदी उपस्थित होते. या वेळी भुजबळ म्हणाले, महाराष्ट्राला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने उपयोग करून घेण्याचे पुढचे पाऊल म्हणून या तरंगत्या हॉटेलकडे पाहिले पाहिजे. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध घटकांशी समन्वय साधून ही संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यात आली आहे. या तरंगत्या हॉटेलमुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्राला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करणार्या या उपक्रमाला मुंबईकर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)